Kolhapur: शेतीला दिवसा वीज, बिलाची माफी ५ वर्षे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 01:38 PM2024-09-28T13:38:29+5:302024-09-28T13:40:01+5:30
नेसरी येथे जनसन्मान यात्रेत घोषणा
गडहिंग्लज : राज्यातील ३ ते ७ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल यापुढे शेतकऱ्यांनी भरायचे नाही, मागील बिलही द्यायचे नाही. ४४ हजार शेतकऱ्याच्या वीजबिल माफीचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय औटघटकेचा नाही. आता शेतीसाठी दिवसा वीज देणार असून वीजबिलाची माफी यापुढे ५ वर्षे कायम राहिल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
नेसरी येथे जनसन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ‘गोकुळ’चे संचालक नवीद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठीच कांदा व बासुमतीवरील निर्यातबंदी हटविण्याबरोबरच निर्यात मूल्यदेखील हटविले आहे. कापूस व सोयाबीनला अधिक भाव मिळण्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवले आहे. हत्ती, बिबटे, गवे, रानडुकरे आदींपासून होणारी नुकसान भरपाईदेखील वाढविणार आहोत.
आमदार राजेश पाटील म्हणाले, अजित पवार, मुश्रीफ यांच्यामुळेच ‘चंदगड’ला १६०० कोटीचा निधी मिळाला. बाबासाहेब कुपेकर, नरसिंगराव पाटील यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तरीदेखील काही लोकांना आगडोंब होत आहे, जनताच त्यांना उत्तर देईल.
खासदार तटकरे, शीतल फराकटे यांचीही भाषणे झाली. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. जानबा चौगुले यांनी स्वागत केले.
मुश्रीफांची अनुपस्थिती..अजितदादांचा खुलासा !
पालकमंत्री मुश्रीफ या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. त्याबाबत खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला. इचलकरंजी येथील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळेच ते नेसरीला येऊ शकलेले नाहीत. माझ्या परवानगीनेच ते इचलकरंजीला गेले आहेत. त्याबाबत कोणताही गैरसमज नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुश्रीफांविषयी त्यांना एवढा पोटशूळ का ?
हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. जिल्ह्याचा विकास आणि बहुजनांच्या हितासाठीच त्यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, केवळ व्यक्तीद्वेषातूनच ‘संसदरत्न’ (सुप्रियाताई सुळे) त्यांच्यावर टीका करीत आहेत. मुश्रीफांविषयी त्यांना एवढा पोटशूळ का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केला.