कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील साळशी गाव वीज, पाणी याबाबत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाची निवड ‘मेक इन इंडिया’मध्ये झाली आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर या गावात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. प्रकल्पातील कामे पूर्ण झाल्यानंतर गाव स्वयंपूर्ण होईल, असा दावा पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.शिक्षण घेतलेले तरुण नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसाय करावा, यासाठी ‘मेक इन इंडिया’ उपक्रम केंद्र सरकारने घेतला. या उपक्रमांतर्गत मुंबईत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा झाली. स्पर्धेत देश-विदेशांतील अनेक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण झाले. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये सिव्हील व मेकॅनिकल अभ्यासक्रम शिकणारे प्रवीण मेंगाणे, प्रतीश वाले, प्रणव भटाले, रविराज पाटील यांनी ‘पाणी’ हा विषय घेऊन तयार केलेला ‘स्वयंपूर्ण खेडे’ हा प्रकल्प सादर केला.प्रकल्पासाठी जानेवारी महिन्यात हे चार विद्यार्थी अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात जाऊन सर्व्हे केला. त्यावेळी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे निदर्शनास आले. सन १९७२ मध्ये बांधलेल्या तलावातही पाणी साठून राहत नाही. अन्य दोन लहान तलावही जानेवारी महिन्यातच कोरडे पडतात, असे समोर आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काय उपाययोजना करायला हव्यात, या अंगाने अभ्यास केला. गावाजवळ डोंगर आहे. पाणी अडविण्यासाठी छोट्या चरींची खुदाई करणे, गाळ थांबू नये, केवळ पाणीच थांबावे, असे बंधारे बांधणे, तीव्र उतार असलेल्या ठिकाणी पाण्यापासून विजेच्या निर्मितीचा प्रकल्प उभारणे, नैसर्गिक पाण्याचे स्रोत बळकट करणे, तलावातील गाळ काढणे अशा कामांचा दीड कोटींचा आराखडा केला आहे. ‘मेक इन इंडिया’त निवड झाल्यामुळे हा प्रकल्प केंद्र शासन वेबसाईटला प्रसिद्ध करून विकासासाठी कंपन्या, उद्योजकांना आवाहन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)आमच्या कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांनी साळशी गावावर तयार केलेला स्वयंपूर्ण खेडे प्रकल्प ‘मेक इन इंडिया’त सादर केला. त्याची निवड ‘मेक इन इंडिया’त झाली आहे. प्रकल्पातील कामे झाल्यानंतर गाव वीज, पाणी याबाबत स्वयंपूर्ण बनेल.डॉ. टी. बी. मोहिते-पाटील, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज
साळशी गाव पाण्यासह विजेने स्वयंपूर्ण होणार
By admin | Published: March 04, 2016 12:46 AM