शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या गणवेशाचा विचार पुढे आला आहे. या शाळांमधील पुरुष शिक्षकांना सोमवारी आणि मंगळवारी पिस्ता रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट, गुरुवारी आणि शुक्रवारी पुरुष शिक्षकांना पिंक (गुलाबी) रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट, तर महिला शिक्षकांना चार दिवस ब्लेझर असा गणवेश राहणार आहे. बुधवारी आणि शनिवारी या शिक्षकांना ऐच्छिक गणवेश वापरता येणार आहे. या नियोजनानुसार सर्व शिक्षकांनी १ एप्रिलपासून शाळेत उपस्थित रहावयाचे आहे. जे शिक्षक गणवेशामध्ये उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी या पत्राद्वारे दिला आहे. दरम्यान, शिक्षण सभापतींनी बुधवारी सभेतून दिलेल्या सूचनांनुसार गणवेशाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत गटविकास शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. गणवेशाबाबत शिक्षक संघटनांनी मान्यता दिली असल्याचे शिक्षणाधिकारी उबाळे यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
शाळांची संख्या : १९७६
शिक्षकांची संख्या : ७०००