पेरणोली : होनेवाडी व मेंढोली येथील परिसरात गेल्या तीन दिवसांपासून हत्तीने धुमाकूळ घातला आहे. जंगलाच्या बाजूने उभे करण्यात आलेले १२ फूट उंचीचे तारेचे संरक्षण कुंपण तोडून हत्तीने शेतात प्रवेश केल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. पाण्याच्या पाइपलाइनसह ऊस पिकाचेही प्रचंड नुकसान केले आहे.आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून हत्तींचा वावर वाढला आहे. होनेवाडी व मेंढोली दरम्यानच्या डोंगर परिसरातील भुतोबा व काळवाट नावाच्या परिसरात हत्तीने नुकसान केले आहे.होनेवाडी येथील मारुती लक्ष्मण पाटील यांच्या पाइपलाइनवरील व्हॉल्वची मोडतोड करून उसाचे, ज्योतिबा तिबिले यांच्या ऊस पिकाचे, तर मेंढोली परिसरातील लष्करे यांच्या उसाचेही नुकसान केले आहे.गेल्या तीन दिवसांपासून हत्तीने आपला तळ होनेवाडी, मेंढोली परिसरात ठोकला आहे. वन विभागाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून, शेतकऱ्यांसह नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Kolhapur News: आजऱ्यातील होनेवाडी, मेंढोली परिसरात हत्तीचा धुमाकूळ, ऊस पिकाचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 1:07 PM