कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांत हत्ती, गव्यांच्याकडून होणारे पिकांचे नुकसान ही नित्याची बाब ठरली आहे. पण आता हत्ती आजरा तालुक्यातील मानवी वस्तीत प्रवेश करत आहेत. या हत्तींकडून मोठा धोका निर्माण झाल्यामुळे येथील जनता भयभीत झाली आहे. वनविभागाकडून हत्तीला पकडण्याची मोहीमही थंड पडल्याने दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.आजरा तालुक्यात हत्ती पाठोपाठ गव्यांनीही नुकसानीचे सत्राचे मोठ्या प्रमाणात सुरु आहे.पिकांचे नुकसान करून न थांबता शेतातील पाण्याची टाकी, विद्युतपंप, डीपी, रस्त्यावरील फलक, पॉवरट्रेलर आदी साहित्यांचे नुकसान करून शेतकºयांना घाईला आणले आहे.दरम्यान, गत चार-पाच दिवसांपासून हत्तीच्या मानसिकतेत बदल होऊन हत्तीने मानवी वस्तीत घुसखोरी सुरू केली आहे. या हत्तीच्या बदलत्या स्वरूपामुळे नागरिक धास्तावले आहेत. चितळेपैकी देसाईवस्ती (ता. आजरा) येथे सायंकाळी सातच्या सुमारास भरवस्तीत प्रवेश करून नागरिकांना ‘सळो की पळो’ करून सोडले.हत्तीचा महाकाय अवतार पाहून डेअरीला दूध घालायला जाणाºया शेतकºयांसह ग्रामस्थांची भंबेरी उडाली आहे. भीतीच्या वातावरणात हत्तीचे छायाचित्रही काढणे कुणाच्या लक्षात आले नाही. भरवस्तीतून जावून वस्तीच्या वरच्या बाजूला असणाºया चितळे ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी फोडली. पुन्हा तो माघारी वस्तीत न येता शेतात मोर्चा वळविल्याने अनर्थ टळला. जंगल, शेताबरोबरच आता मानवी वस्तीतही वन्यप्राणी येऊ लागल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त होणे अत्यावश्यक बनले आहे.पीक घरी नाहीचगेल्या दोन वर्षांपासून हत्ती, चितळे, जेऊर, मसोली, देवर्डे, हाळोली, वेळवट्टी, पेरणोली, सोहाळे, पोळगाव या परिसरात ठाण मांडून आहे. त्यांनी ऊस, भात, केळी, नाचणा, मेसकाठी आदी पिकांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले असून पीक शेतकºयांच्या घरी येतच नाही, अशी अवस्था आहे.वेळवट्टी गावातील आठवणचार वर्षांपूर्वी वेळवट्टी(ता. आजरा) या गावात हत्तीने प्रवेश करून घरांची छप्परे, दरवाजे फोडून धुमाकूळ घातला होता. वेळवट्टीतील आठवण पुन्हा ताजी झाली आहे.आजºयात हत्ती,चंदगडमध्ये बिबट्याआजरा तालुक्यात मानवी वस्तीत प्रवेश करून हत्ती धुमाकूळ घालत आहे तर शेजारच्या चंदगड तालुक्यात माडवळे, सुपे व कुद्रेमनी गावालगत बिबट्याचा वावर सुरू आहे. दोन्ही तालुक्यांत हत्ती व बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वावर सुरू आहे.
हत्तीमुळे आजऱ्यातील जनता भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:11 AM