कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशी आणि परिसरात नागरी वस्तीत आलेल्या हत्तींना वन विभागाच्या पथकाला सुरक्षितपणे उत्तुर आणि पिंपळगाव येथील जंगलात पाठविण्यात यश मिळाले.वन विभागाला आज सकाळी ८ वाजता वाजल्यापासून हत्ती कापशी परिमंडलातील तमनाकवाडा येथे आल्याचे वृत्त समजले, त्यानंतर तत्काळ वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी यापूर्वी हत्तीचा वावर नसल्याने लोकांनी हत्ती पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती, त्यामुळे बघ्यांची गर्दी आवरणे हे एक आव्हानच वन विभागाकडे होते.हत्तीला सुरक्षित जंगलात पाठवण्यासाठी वनविभागाची तत्काळ पथके गठीत करण्यात आली व कामाचे वाटप करण्यात आले. यात आजरा, चंदगड, पाटणे, राधानगरी, करवीर, गगनबावडा, पन्हाळा येथील फिरते पथक, वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र कोल्हापूर मधील वनसेवक, वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल यांनी नियोजनपूर्वक हत्तीला सुरक्षित अधिवासात परतवून लावण्याचे नियोजन केले. उसाचे क्षेत्र असल्याने हत्तीला उसात लपण्यास बरीच जागा मिळत होती. त्यामुळे त्याचे लोकेशन शोधून पुढील रस्त्याला मार्गस्थ करण्याचे आव्हान सर्वांसमोर होते.रस्ता क्रॉस करताना संपूर्ण ट्रॅफिक थांबवून हत्ती पास करणे हे अतिशय आव्हानात्मक काम वनविभागाने यशस्वीपणे पार पाडले. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर व त्यांच्या पथकाने या मोहिमेत महत्वाची भूमिका पार पाडली. संपूर्ण ऑपरेशन पार पाडण्यात स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले. या सर्व मोहिमेत उपवनसंरक्षक आर.आर.काळे, सहायक वनसंरक्षक सुनील निकम यांनी मार्गदर्शन केले.
ड्रोन कॅमेराचा वापरउसाच्या शेतातील हत्तीचे अचूक लोकेशन समजण्यासाठी वनविभागाने वेळोवेळी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला. यामुळे हत्तीचे योग्य ठिकाण समजण्यात मदत मिळाली आणि त्यांना योग्य ठिकाणी मार्गस्थ करता आले.
स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने हत्तींना मार्गस्थ करण्यात यश मिळाले आहे. कोणतीही जीवितहानी न होता पूर्ण मोहीम पार पडली.- सुधीर सोनवले,परिक्षेत्र वन अधिकारी, करवीर,कोल्हापूर वनविभाग.