आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : कोल्हापूरच्या विभागीय क्रीडासंकुलाचे काम नऊ वर्षांनंतर अजूनही अपूर्णावस्थेत आहे. यात कधी वाढलेल्या साहित्याच्या किमती, तर कधी लालफितीच्या कारभारामुळे हे काम पूर्ण होण्याचे काही नाव घेईना झाले आहे. सद्य:स्थितीत शूटिंग रेंज, जलतरण तलाव अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे या संकुलाचे काम म्हणजे ‘हत्ती गेला अन् शेपूट राहिले’ असे झाले आहे.
डिसेंबर २००९ मध्ये राज्य शासनाने कोल्हापुरातील संभाजीनगर पद्माळा येथे विभागीय क्रीडासंकुलाच्या उभारणीस मान्यता दिली व काम सुरू झाले. यात पहिल्या टप्यात शुटिंग रेंज, लॉन टेनिस कोर्ट, फुटबॉल मैदान, जलतरण तलाव (डायव्हिंग बोर्ड), खो-खो मैदान, कबड्डी मैदान, व्हॉलिबॉल मैदान, बास्केटबॉल मैदान, ४०० मीटर धावनपट्टी, इनडोअर हॉल, प्रशासकीय इमारत व क्रीडा वसतीगृह यांचा समावेश होता. त्यापैकी फुटबॉल मैदान, लॉन टेनिस, बास्केटबॉल मैदान, धावपट्टी, हे खेळाडूंना सराव करण्यायोग्य तयार करण्यात आले असून, त्यांचा दर्जा उच्च नाही. त्यामुळे ती राष्ट्रीय मानांकनानुसार केलेली नाहीत. याशिवाय ही मैदाने सर्वसामान्यांना अद्यापही खुली करण्यात आलेली नाहीत. सर्वत्र अस्वच्छता पसरली होती.
ही बाब ध्यानी येताच क्रीडाविभागाने बुधवारी महिला मजुरांकडून परिसराची स्वच्छता करून घेतली. या संकुलात गेल्या वर्षभरात पावसाळी शालेय फुटबॉल व कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा संपूर्णपणे चिखलमातीत घेण्यात आल्या. मुलींसाठी या ठिकाणी स्पर्धेदरम्यान चेंजिंग रूम अथवा स्वच्छतागृहाची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. जलतरण तलावाजवळील गॅलरीखालील सर्व खोल्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात फरशा उखडल्या असून तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. सुरक्षारक्षकाची नेमणूक नसल्याने या ठिकाणी कोणीही सहज प्रवेश करीत आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी गेल्या वर्षभरात आढावा बैठकीदरम्यान अनेक वेळा तोंडी व लेखी आदेश देऊनही या आदेशांना क्रीडा विभागाने वाटाण्याचा अक्षता लावल्या. अनेक वेळा स्वत: तत्कालीन विभागीय आयुक्त व तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी कंत्राटदार व क्रीडाधिकाऱ्यांना धारेवर धरले; पण कामे काही केल्या पूर्ण झाली नाहीत.
बुधवारी क्रीडासंंकुलातील शूटिंग रेंजमध्ये इलेक्ट्रिकल कामे पूर्ण करून घेण्यात आली; तर जलतरण तलावाची स्थिती अद्यापही ‘जैसे थे’च आहे. तलावामध्ये अद्यापही कैद्यांच्या शेतातून जाणाऱ्या नाल्याचे पाणी मुरत आहे. त्यामुळे या जलतरण तलावावर केलेला लाखो रुपयांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेला आहे. विविध संघटनांनीही वारंवार आवाज उठवूनही क्रीडासंकुलाचे काम काही केल्या पूर्ण होत नाही.
नऊ वर्षांनंतरही विभागीय क्रीडासंकुलाचे काम कागदावर ८० टक्केच पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. संभाजीनगर येथील विभागीय क्रीडासंकुलामध्ये बुधवारी स्वच्छता करण्याचे काम सुरू होते.