वैभववाडी : कुसूरच्या जंगलात काल, सोमवारी सायंकाळी हत्तींनी दर्शन दिल्यानंतर रात्री नापणे, खांबाळे व आचिर्णेत नासधूस करून दोन हत्ती पुन्हा कणकवलीकडे रवाना झाले. परतीच्या प्रवासात त्यांनी सात शेतकऱ्यांच्या ऊस शेतीसह माड व केळींचे नुकसान केले. चार दिवस मुक्कामी राहिलेले हत्ती हुमरटच्या पुढे गेल्याचे वनखात्याने स्पष्ट केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.शुक्रवारी आचिर्णेत दाखल झालेल्या हत्तींनी शनिवारी रात्री आचिर्णे, खांबाळे व एडगावात पिकांचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी रात्री त्यांनी कुसूर पिंपळवाडीत ऊसशेती भुईसपाट केली. काल, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वनकर्मचाऱ्यांना कुसूरच्या जंगलात हत्तींचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तेथून रात्री ९.३० च्या सुमारास ते नापणेच्या हद्दीत गेले. हत्तींनी सदाशिव चोरगे यांच्या नापणेतील उसाचे नुकसान करून कोकिसरे-खांबाळेच्या दंडावरील घाटगे-पाटील यांच्या माडबागेचे नुकसान करून खांबाळेचा रस्ता धरला. (प्रतिनिधी)हत्ती दिसताच तारांबळरात्री ११.३० वाजता खांबाळे-टेंबवाडी येथील मंगेश कदम यांच्या घरालगतच्या रस्त्यावर दोन हत्ती लोकांच्या नजरेस पडले. हत्तींनी कदम यांची झाडांची खते व भाताच्या टरफलांचे नुकसान केले. हत्ती दिसताच टेंबवाडीत तारांबळ उडाली. नारायण पवार यांची कुळीथ शेती, अनंत पवार, शंकर कांबळे यांच्या केळींचे नुकसान करून हत्ती रात्री १.३० च्या सुमारास आचिर्णे कडूवाडीत पोचले. तेथील श्रीधर कडू यांच्या माडांच्या झाडांसह जांभ्या दगडांची संरक्षण भिंत कोसळून घातली. तेथून गडमठमार्गे कणकवलीच्या हद्दीत हत्ती रवाना झाले.वनकर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा श्वासगेल्या चार दिवसांपासून दोन अधिकाऱ्यांसमवेत २५ वनकर्मचारी हत्तींच्या मागे होते. हत्तींनी वैभववाडी तालुका सोडल्यामुळे वनकर्मचाऱ्यांनीही सुटकेचा श्वास टाकला. दरम्यान, सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास कुसूर पिंपळवाडीत महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांच्या वाहनासमोर हत्ती आल्याचे सांगितले जाते. समोर हत्ती दिसताच त्यांना धडकी भरली. मात्र, रस्ता ओलांडून हत्ती पुढे गेल्याने त्यांचे वाहन सुदैवाने बचावले.
हत्तींचा मोर्चा कणकवलीकडे !
By admin | Published: January 06, 2015 11:19 PM