चंदगड : अडकूर परिसरात आज, दिवसाढवळ्या टस्करचे दर्शन झाल्याने भागात एकच खळबळ उडाली. ऐरवी झांबरे, हेरे, गुडवळे, जेलुगडे, कलिवडे, हाजगोळी भागात वावरणाऱ्या टस्करचे अडकूर परिसरात पहिल्यादांच दर्शन झाले. यावेळी घटप्रभा नदीत डुंबणाऱ्या टस्करला पाहण्यासाठी पूलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काहीवेळ वाहतुकीलाही अडथळा झाला. यानंतर नदीतूनच पलीकडे जात टस्कर केंचेवाडी गावात घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली.चंदगड तालुक्यात सिंधुदुर्ग व कर्नाटक सीमेवर जंगलात हत्ती वारंवार आढळून येतात. तर अनेकदा या हत्तींकडून मोठे नुकसान देखील केले जाते. अशात आता अडकूर, गणुचीवाडी, आमरोळी, केंचेवाडी परिसरात टस्करचे शुक्रवारी सकाळच्या सुमारास दर्शन झाले. अडकूर परिसरातील गणुचीवाडी येथील कोट यांच्या शेतातून टस्कर घटप्रभा नदीच्या दिशेने जाताना लोकांच्या निदर्शनास आला. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने बघताबघता त्याला पाहण्यासाठी परिसरात गर्दी झाली.त्यानंतर घटप्रभा नदीतही टस्करने डुंबक्या घेतल्या. बऱ्याचवेळ टस्कर नदी पात्रात होता. नंतर तो घटप्रभा नदी ओलांडून पलीकडे गेला. त्यामुळे परिसरातील अनेकांच्या शेतात टस्करच्या पायांचे ठसे दिसून आले. अचानक आलेल्या या टस्करने शेतकऱ्यांची भिंबेरीच उडवली. तर अनेकांनी परिसरातील शेतकऱ्यांना सावध केले.या घटनेने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र उसाची लागवड केलेली असून या टस्करकडून उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. त्यामुळे वन विभागाने टस्कराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
चंदगड तालुक्यात दिवसा ढवळ्या 'टस्कर'चा वावर, नदीत डुंबणाऱ्या टस्करला पाहण्यासाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 2:54 PM