कोल्हापूर : वंदूर (ता. कागल) येथील तीनपानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ७) रात्री छापा टाकून अकराजणांना अटक केली. यावेळी संशयितांच्या ताब्यातून रोकड आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे ५० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने कागल परिसरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.संशयित बळिराम आप्पासो इंगळे (वय ३४, रा. हनुमान गल्ली, वंदूर, ता. कागल), दीपक अशोक कांबळे (३८), अरुण केरबा लोहार (३६, दोघे, रा. माळवाडी, शाहूनगर, वंदूर), श्रीधर रघुनाथ पाटील (३७),बाबासो सूर्याजी भोसले (३८), संदीप दिनकर लोकरे (३५), संभाजी महादेव पाटील (४१), फिरोज अकबर पटेल (३३), संतोष राजाराम गायकवाड (३५), अमोल बाबासो वडर (२७), शिवाजी बाबूराव दरी (४४, सर्व, रा. लोहार गल्ली, कोगनोळी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना वंदूर गावचे हद्दीत रासायनिक कारखाना परिसराजवळील शेतवडीत बळिराम अप्पासो इंगळे यांच्या शेडबाहेर काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली.
त्यांनी सहायक फौजदार विजय गुरखे, श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, श्रीकांत पाटील, किरण गावडे, सुरेश पवार यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी रात्री साउेनऊच्या सुमारास पथकाने छापा टाकला. अचानक पोलीस आल्याने काहीजण अंधाराचा फायदा घेत पलायनाच्या तयारीत होते; परंतु पोलिसांनी चारीही बाजूंनी त्यांना घेराव घातला होता. त्यामुळे संशयितांना पलायनाची संधीच मिळाली नाही. पथकाने सर्वांना ताब्यात घेऊन पंचनामा करून कागल पोलिसांच्या ताब्यात दिले.मोतीनगरमध्ये दारू विक्रेत्यास अटककोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोतीनगर येथे देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयित ब्रह्मानंद विलास बागडे (वय ३८) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पाच हजार किमतीची दारू जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र पोवार यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.