बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या बारा महिन्यांत सरासरी ३३२३ रुपये प्रतिक्विंटल दराने साखरेची विक्री केल्याचे गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलेल्या लेखी माहितीतून उघड झाले. ही माहिती रात्री उशिरा मिळाल्याने त्याचा अभ्यास केलेला नाही. आज, शुक्रवारी बँकेने कारखानानिहाय दिलेली आणि वार्षिक अहवालात दिलेल्या साखर विक्रीचा आणि शिल्लक साखरेचा तुलनात्मक अभ्यास करून आम्ही त्याचे उत्तर देऊ असे संघटनेने स्पष्ट केले आहे.गेल्या गळीत हंगामातील उसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. कारखानदार खुल्या बाजारात चढ्या दराने साखरेची विक्री करीत आहेत. मात्र आरएसएफच्या सूत्रानुसार ऊस उत्पादकांना ४०० रुपये द्यावे लागतात, म्हणून कमी दराने साखरेची विक्री केल्याचे दाखवत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. म्हणून त्यांनी जिल्हा बँकेला पत्र देऊन प्रत्येक महिन्याला केलेल्या साखर विक्रीची आणि दराची माहिती द्यावी, अशी मागणी बुधवारी केली होती. यानुसार बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी आक्रोश पदयात्रा बांबवडे येथे असताना शेट्टी यांना ११ कारखान्यांची माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील वाळव्याचा हुतात्मा वगळता इतर १० कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. बँकेने दिलेल्या माहितीनुसार सरासरी ३३२३ रूपये प्रतिक्विंटल दराने साखरेची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती देऊन संघटना खुल्या बाजारात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल असा साखरेचा भाव आहे, असा संघटनेचा दावा बँकेने खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे यावर संघटना पुढील भूमिका काय स्पष्ट करणार यासंबंधी उत्सुकता आहे.
कोल्हापुरातील अकरा कारखान्यांनी ३३२३ रुपये दराने केली साखरेची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 11:49 AM