कोल्हापूर : जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत मद्य विक्रीला बंदी असतानाही चोरून मद्यविक्री करणाऱ्या अकरा बियर बार आणि वइन्स शॉपचे परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी प्रस्ताव कोल्हापूर पोलीस दलाने तयार केला आहे. हा प्रस्ताव दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील बियर बार, वाईन्स शॉपमधून मद्यविक्रीसाठी बंदी घातली होती. तरीही काही मद्यविक्री व्यावसायिकांनी कोविड नियमावलींचा भंग करून विनापरवाना मद्यविक्री केली होती. जिल्ह्यात अशा ११ व्यावसायिकांच्यावर स्थानिक पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी ११ व्यावसायिकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.