कोल्हापूर : बेकायदेशीर तलवारी विक्रीसाठी घेऊन आलेल्या सराईताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. संशयित अमरजितसिंग महेंद्रसिंग खनुजा (वय ५०, रा. जुना वाशी नाका, शिवाजी पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ११ तलवारीसह रोकड असा सुमारे १७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर हत्यारे बाळगणे व विक्री करणाऱ्यांची माहिती घेताना खबऱ्याकडून निवडणुकीसाठी संशयित अमरजितसिंग खनुजा याने घातक शस्त्रे आणली असून लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार येथील ओम एंटरप्रायजेस दुकानात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. यावेळी खनुजाच्या ताब्यातून तलवारी व बाराशे रुपये जप्त केले.
त्याच्याविरुद्ध भारतीय हत्याचारा कायदा सन १९५९ चे कलम ७ चा भंग २५ १-अ सह मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला. खनुजा हा सराईत असून यापूर्वी त्याच्याविरोधात शस्त्रविक्रीचे लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा व हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.नागरिकांना आवाहनजिल्ह्यात बेकायदेशीर कोणी शस्त्रे बागळगून असेल किंवा दहशतीसाठी त्याचा वापर करत असतील तर त्यांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना कळवावी, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले आहे.