कोल्हापूर : शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आज, बुधवारपासून केंद्रीय प्रक्रियेचा प्रारंभ होणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या (www.dydekop.org) या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी दि. ३० ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मंगळवारी प्रवेशाबाबत माहितीपुस्तिका, प्रक्रियेचे वेळापत्रक, अर्ज भरण्याची व्हिडीओ स्वरूपातील माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्यावतीने संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. प्रक्रियेतील डॅशबोर्ड समितीकडून सुरू करण्यात आला. अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी समितीने टोल-फ्री क्रमांकाच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू केली आहे. प्रवेश प्रक्रियेतील दोन फेऱ्या होणार आहेत. पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसरी फेरी होईल. ऑनलाईन अर्जातील भाग एक आणि दोन भरण्यास ३० ऑगस्टपर्यंतची मुदत राहणार असल्याचे प्रवेश समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी मंगळवारी सांगितले.
चौकट
असा भरावा लागणार अर्ज...
पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर स्वत:चा अथवा पालकांचा मोबाईल क्रमांक ऑनलाईन नोंदणी करावा. त्यानंतर त्यांनी स्वत:चे आणि आईचे नाव, दहावीचे गुण, बोर्डाचे नाव, उत्तीर्ण झालेले वर्ष, जन्मतारीख, आधारकार्ड क्रमांक आदी प्राथमिक स्वरूपातील माहिती अर्जाच्या पहिल्या भागात नोंदवावी. त्यानंतर अर्जाचे शुल्क ११० रुपये ऑनलाईन भरावे. हे शुल्क भरल्यानंतर त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. त्याद्वारे त्यांच्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी होईल. ती झाल्यानंतर पुढे अर्जातील दुसरा भाग भरावयाचा आहे. त्यात विद्याशाखा, महाविद्यालयाबाबतचे पसंतीक्रम नोंदवायचे आहेत.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक...
दि. ३० ऑगस्ट : ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत
दि. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर : अर्जांची छाननी
दि. ३ ते ६ सप्टेंबर : निवड यादी तयार करणे
दि. ७ सप्टेंबर : निवड यादीची प्रसिद्धी
दि. ७ ते ८ सप्टेंबर : तक्रार निवारणाची प्रक्रिया
दि. ८ ते १५ सप्टेंबर : प्रवेश निश्चिती