कोल्हापूर : प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत बुधवार (दि.९) पर्यंत वाढविली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील एकूण ३९४० विद्यार्थ्यांनी सोमवारपर्यंत प्रवेश निश्चित केले आहेत.
शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीमधील प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही दि. ३ डिसेंबरपासून सुरू झाली. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी निवड यादीमध्ये ९५८८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ३९४० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केले आहेत.
पूर्वनियोजनानुसार पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्यातील अंतिम मुदत आज, मंगळवार सायंकाळी पाचपर्यंत होती. मात्र, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने मुदत वाढविण्यात आली आहे. पहिल्या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग गुरुवारी (दि. १०) पासून भरणार आहेत, अशी माहिती शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले यांनी दिली.प्रवेशाची शाखानिहाय आकडेवारी
- विज्ञान : १८९५
- वाणिज्य (इंग्रजी) : ६२०
- वाणिज्य (मराठी) : ७५८
- कला (मराठी) : ६२४
- कला (इंग्रजी) : ४३
पॉलिटेक्निकची तात्पुरती यादी जाहीरजिल्ह्यातील शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्नीक) मधील प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी सात वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ऑनलाईन जाहीर झाली. त्याबाबत हरकती नोंदविण्याची मुदत गुरुवारी (दि.१०) पर्यंत आहे.आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसरी फेरी सोमवारी संपली. या फेरीत ९०, तर पहिल्या फेरीत २८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तिसऱ्या फेरीची प्रक्रिया शनिवार (दि. १२)पासून सुरू होणार आहे.