कोल्हापूर भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची सोमवारी भेट घेतली. सी.पी.आर. मधील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील त्रुटी व काही दिवसांपूर्वी कोरोना कक्षातील झालेल्या दुर्घटनेसंदर्भात फायर ऑडिट व इलेक्ट्रिकल ऑडिटबाबत सविस्तर चर्चा केली.
चिकोडे म्हणाले, रुग्णालयांचे फायर ऑडिट व इलेक्ट्रिकल ऑडिट नियमित होणे गरजेचे आहे. सी.पी.आर. मधील कोरोना वॉर्डला आग लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सी.पी.आर.चे फायर ऑडिट व्हावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणीचे लेखी उत्तरदेखील सी.पी.आर. प्रशासनाने दिलेले नाही. मोरे, वैद्यकीय अधीक्षक विजय बरगे यांच्यासमवेत भाजप शिष्टमंडळाने सी.पी.आर. मधील नवजात शिशु अतिदक्षता विभागास भेट देऊन या विभागाची झालेली दुरवस्था, तसेच नवजात शिशूंना ठेवण्यासाठी असणाऱ्या वॉर्मरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त शिशु ठेवल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे डॉ. एस. एस. सरवदे उपस्थित होते. अपघात विभागाला भेट दिली असता तेथील मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. अपघात विभागातील अस्वच्छता, रुग्णांची होणारी गैरसोय निदर्शनास आणून दिली. या सर्व त्रुटींची सुधारणा त्वरित व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिष्टमंडळात सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, विजय आगरवाल, चिटणीस सुनीलसिंह चव्हाण, अक्षय निरोखेकर, कृष्णा आतवाडकर, सिद्धार्थ तोरस्कर यांचा समावेश होता.