चंदगड : अडकूर (ता. चंदगड) येथील सेवासंस्थेत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१ ९ या आर्थिक वर्षात १ कोटी ४६ लाख पाच हजार ४९७.७० रुपयांचा अपहार झाला आहे. याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक नामदेव सरनोबत यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
विद्यमान अध्यक्ष, उपााध्यक्ष, संचालक, संचलिका, बँक निरिक्षक, बँक शाखाधिकारी अशा एकूण १६ जणांविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
अडकूर (ता. चंदगड ) येथील सेवा संस्थेतील सभासदांच्या खोट्या नोंदी व खोट्या सह्या करून कर्जरोखे न घेता पोकळ कर्ज नावे टाकण्यात आले आहे. त्यातून रोख शिल्लक कमी करून ५० लाख ९४ हजार ८५० रुपयांची उचल करण्यात आली. त्याशिवाय खोटे रेकॉर्ड तयार करून ६७ लाख रुपये आणि सभासद कर्जाच्या येणे यादीमध्ये फरकाची रक्कम २८ लाख १० हजार ४९७ रुपये ७० पैसे दर्शवून तो अपहार केला आहे. अपहाराची एकूण रक्कम १ कोटी ४६ लाख ५ हजार ४९७ रुपये ७० पैसे होते.बोगस मेंबर कर्ज, खावटी कर्ज, कर्जावील व्याज न घेता बंद केलेली रक्कम, सभासदांच्या ठेवीची रक्कम सभासदांच्या सह्या न घेता उचल, खर्चाचे बिल व्हौचर्स न घेता इतर खर्चावरील रकमा अशी एकूण १कोटी ४६ लाख पाच हजार ४९७ रुपये ७० पैसे संस्था रोजकिर्दीच्या जमा रकमेच्या हात शिल्लकेतून बँक चालू खातेस प्रत्यक्ष भरणा न करता फक्त किर्दीला पोकळ जमा खर्च केलेला आहे. तथापि त्यांचे भरणा काँन्टर तपासणीला उपलब्ध न झाल्यामुळे बँकेचा खाते ऊतारा मागवून वेळ घेतले असता सदर बँक चालू खातेस खर्ची पडललेल्या रकमा बँक खात्यास भरणा केलेचे दिसून येत नाहीत.
कर्जावरील व्याज न घेणे, सभासदांच्या नावावर बोगस कर्ज टाकून, मेंबर ठेव व खर्च व्हौचर्स नांवे टाकून संस्था हातशिल्लक घटविणेत आलेली आहे. संस्थेच्या सर्व रक्कमेचा आपल्या खासगी कारणासाठी वापर करुन संस्था सभासदांची फसवणुक करून सभासदांचा विश्वासघात केला आहे व संस्थेच्या सार्वजनिक निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय देसाई, संचालक जगन्नाथ इंगवले, संतू गुरव, नारायण इंगवले, सिध्दोजी देसाई, राजाराम घोरपडे, प्रकाश इंगवले, उत्तम चिलगोंडे, महादेव नाईक, मीना शिंदे, रंजना कबाडे, लिपिक कादर कोवाडकर, सचिव पुंडलिक घोळसे यांच्यासह जिल्हा बँकेचे शाखाधिकारी आनंदा कांबळे ( रा. हाळोली ता. आजरा ) जिल्हा बॅँक अडकूर शाखेचे निरिक्षक दादु हसन मुल्ला (रा. गडहिंग्लज ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक सहाय्यक फौजदार जमादार तपास करत आहेत .