कोल्हापूर : व्यवस्थापक पदाचा तात्पुरता कार्यभार असताना मोबाईल कंपनीच्या शाखेतील सुमारे २५ मोबाईल परस्पर विकून सुमारे ३ लाख ५१ हजार २४१ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बसंत-बहार चित्रमंदिर मार्गावरील एका मोबाईल शॉपीत घडला. याप्रकरणी मोबाईल कंपनीचे ग्राहक सेवा प्रतिनिधी सचिन प्रकाश शेडबाळे (रा, रामकृष्ण परमहंस सोसायटी, जगदाळे मळा, सांगली) यांच्यावर शाहुपुरी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बसंत बहार चित्रमंदिर मार्गावरील एका मोबाईल कंपनीच्या शाखेत राकेश रवींद्र पाटील (वय ३१, रा. न्यू हडको कॉलनी, अयोध्या थिएटरनजीक, चैतन्य नगर, सांगली) हे व्यवस्थापक आहेत. ते दिनांक २० फेब्रवारी ते १५ मार्च २०२० या कालावधीत रजेवर होते, त्या कालावधीत व्यवस्थापक पदाचा तात्पुरता कार्यभार हा कंपनीचे ग्राहक सेवा प्रतिनिधी सचिन शेडबाळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
यावेळी कंपनीच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी न घेता शेडबाळे यांनी कंपनीच्या सुमारे ३ लाख ५१ हजार २४१ रुपये किंमतीच्या २५ मोबाईलची परस्पर विक्री करुन त्या रकमेचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या अपहारप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात सचिन शेडबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.