उदगाव : ग्रामीण भागातील नागरिकांना प्रदूषणापासून अलिप्त राहता यावे व पारंपरिक साधनांचा वापर करून गावे समृद्ध व्हावीत, याकरिता उदगाव (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीची निवड राज्यपातळीवरील माझी वसुंधरा या योजनेसाठी झाली आहे. गेले काही दिवस राज्य शासनाने घालून दिलेल्या निकषांनिहाय काम सुरू आहे. लवकरात लवकर उद्दिष्ट पूर्ण करून आम्ही स्पर्धेत यशस्वी होऊ, असा आशावाद ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी यांनी दिला आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ग्रामपंचायतींना सक्षम बनविण्यासाठी माझी वसुंधरा ही योजना राबविली आहे. या योजनेंतर्गत भारतीय वंशाचे वृक्षारोपण करणे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जैवविविधता, जलस्रोतांचे संवर्धन करणे, जमिनीची धूप थांबविणे, सौरदिवे बसवून ऊर्जा बचत करणे यांसारखे नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायतींना बळ देण्याचे धोरण ठेवले आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक निकषाला गुणांकन असून, ३१ मार्चपर्यंत वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा संकेतस्थळावर दाखल करावयाचा आहे. तद्नंतर समिती त्याची पडताळणी करणार आहे.
कोट -
या स्पर्धेसाठी गावाने जोरदार तयारी केली असून, वृक्षलागवड, जैवविविधता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या पडताळणीसाठी आम्ही सज्ज आहोत.
- सागर कदम, संस्थापक ड्रीम फाउण्डेशन
कोट -
गेले सहा महिने ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी या योजनेसाठी राबत आहेत. आम्हीही गावाच्या माध्यमातून त्यांना साथ देत आहोत. तरी सर्वांच्या मदतीने आणखीन उर्वरित कामे करू. ग्रामस्थांनीही यामध्ये सहभाग नोंदवावा.
- अरुण कोळी, ग्रा. पं. सदस्य