बुकीमालकांची नावे पुढे आली असून, त्यापैकी एक मटका व क्रिकेट बेटिंगमधील ‘सम्राट’ आहे. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्याच्याही मुसक्या आवळण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह ठाकूर ऊर्फ प्रकाश बेला, शिवन (पूर्ण नाव माहीत नाही), रोहन परांडेकर, चेतन वरुटे, संतोष परमार, नितीन ओसवाल या संशयित बुकीमालकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले असता मटका व बेटिंगमध्ये माहिर असलेल्या आणखी दोघांची नावे पुढे आली आहेत. त्यांची क्रिकेट बेटिंगमध्ये भागीदारी असल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी एक बुकीमालक मटका व बेटिंगमध्ये ‘सम्राट’ आहे. गतवर्षी मुरलीधर जाधव यांच्या टाकाळा येथील जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असताना राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणात मुरलीधर जाधव यांच्यावर कारवाई झाली होती. त्यावेळी या ‘सम्राट’चे नाव पुढे आले होते. शहरात राजरोसपणे त्याचा मटका चालतो; परंतु त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिसांचे झालेले नाही. आतापर्यंत त्याच्या पंटरांवरच कारवाई झाली आहे. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मटका व बेटिंगची पाळेमुळे उखडून टाका. मग तो कोणीही असो, त्याच्या मुसक्या आवळा, असे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी मटका व बेटिंगवर लक्ष केंद्रित करून शहर व उपनगरांतील मटका-बेटिंग घेणारे व खेळणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी केली आहे. येत्या चार-पाच दिवसांत त्या ‘सम्राटां’च्या मुसक्या आवळणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.+कनेक्शन दुबईपर्यंत; १२ कोटींची उलाढालकोल्हापूर : क्रिकेट बेटिंग प्रकरणातील पंटर व बुकीमालकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले असता बेटिंगचे कनेक्शन कोल्हापूर ते दुबईपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरू असलेल्या ‘वर्ल्ड टी-२०’ सामन्यांमध्ये कोल्हापुरातून सुमारे १२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कसून चौकशी करत आहेत. कोल्हापूर, पुणे, नागपूर, गुजरात, मुंबई ते दुबई असे कनेक्शन पाहून पोलिसही अचंबित झाले. आतापर्यंत झालेल्या ‘वर्ल्ड टी-२०’ क्रिकेट सामन्यामध्ये कोल्हापूर शहर, गांधीनगर व इचलकरंजी येथून सुमारे १२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहे. बेटिंगच्या मुख्य सूत्रधारांमध्ये मुरलीधर जाधव याच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे. लवकरच बेटिंग घेणाऱ्या बड्या धेंड्यांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.
बेटिंगमध्ये ‘सम्राट’ची भागीदारी
By admin | Published: March 28, 2016 11:52 PM