लोकमत न्यूज नेटवर्क
भादोले : येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, कोरोना समिती, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये जास्ती जास्त लसीकरण करावे, अशा सूचना पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी केल्या.
सभापती पाटील यांनी भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.
यावेळी सभापती पाटील म्हणाले, कोरोना समिती, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, डॉक्टरांनी झोकून घेऊन काम करावे. हलगर्जी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. बैठकीत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विनामास्क दुकानात बसणाऱ्यांवर व ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच किरकोळ लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रूग्ण घरात न ठेवता कन्या शाळेत अलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सरपंच आनंदा कोळी, धोंडीराम पाटील, पोलीस पाटील हर्षवर्धन माने, ग्रामपंचायत सदस्य विक्रम माने, शहाजी घोलप, आनंदराव सुतार, सुजाता नांगरे, रूपाली पाटील, अश्विनी घोरपडे, अलका पाटील, बिस्मीला जमादार, ग्रामसेवक शामसुंदर मुसळे, तलाठी तुषार भोसले, प्रकाश माने, दिलीप पाटील, कोतवाल संजय अवघडे आदी उपस्थित होते.