कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची परिस्थिती सुधारण्यात बॅँकेचे कर्मचारी आघाडीवर राहिले आहेत आणि येथून पुढेही ते राहणार आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या इंडेक्सप्रमाणे पगारवाढ होते; पण बॅँकेतील काही कामगारद्वेष्ट्या व्यक्तींना पोटशूळ उठल्याचा आरोप कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅँक एम्प्लॉईज युनियन व बॅँक एम्प्लॉईज युनियन, कोल्हापूर यांनी प्रसिद्धिपत्रकातून केला आहे. बॅँकेमध्ये सध्या शंभर शिपाई २५०० रुपयांवर राबत आहेत. यामध्ये व्यवस्थापनाचा नाकर्तेपणा आहे. बॅँक अडचणीत आली ती संचालक मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे; पण शिपाई व लिपिक, लहान अधिकाऱ्यांनी जिल्हाभर जागृती करून मोर्चे काढले. यामध्ये ३७० कोटी रुपये वसूल झाले, म्हणून चर्चा करण्यासाठी आज बॅँक शिल्लक राहिली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माने यांना जाब विचारला असता, महागाई निर्देशांक पगारवाढ, घट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बॅँक शेतकऱ्यांना अल्प व्याजाने कर्ज देते, त्याचा बोजा बॅँक सोसते; पण शेतकऱ्यांचे पुढारी म्हणणारे साखर कारखान्यांचा व्यवसाय दुसऱ्या बॅँकेकडे नेतात. कारखाने सुरू करताना जिल्हा बॅँकेची मदत हवी; पण साखर कारखान्यांचा व्यवसाय जिल्हा बॅँकेकडे नाही. यासाठी कर्मचारी जागृती करण्याच्या प्रयत्नाला सहकार्य करावे, असे आवाहन युनियनने केले आहे. (प्रतिनिधी)प्रशासक किती पगार घेतात?कर्मचाऱ्यांना पगारवाढ केली म्हणून काही अधिकाऱ्यांना वाईट वाटत आहे; पण बॅँकेवर आलेले प्रशासक प्रतापसिंह चव्हाण किती पगार घेतात, याची माहिती घ्यावी, अशी टीकाही युनियनने केली आहे.
जिल्हा बँकेची परिस्थिती सुधारण्यात कर्मचारी आघाडीवर
By admin | Published: February 01, 2015 11:55 PM