कागल : घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली करण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून कागल नगरपालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर २०१५ या महिन्याचा पगार मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी रोखला असल्याने कर्मचारी वर्गात ‘अस्वस्थता’ पसरली आहे. दर महिन्याच्या पाच-सहा तारखेला होणारा पगार महिनाअखेर आली तरी खात्यावर जमा झाला नसल्याने कर्मचारी वर्गाची आर्थिक कुचंबणा झाली आहे. दुसऱ्या बाजूला करांची वसुली नाही तर पगाराला पैसे कोठून आणायचे? असा पवित्रा मुख्याधिकारी यांनी घेतला आहे. यामुळे यातून कसा मार्ग काढायचा या प्रश्नात कर्मचारी अडकले आहेत, तर विधान परिषदेच्या सहलीमुळे लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. नगरपालिकेकडे १२० कर्मचारी आहेत. त्यापैकी १८ कायम कामगार आणि ३० ठेकेदारीचे कामगार करवसुली विभागात काम करतात. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात पालिकेला २ कोटी ३० लाख रुपये घरफाळा पाणीपट्टी वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत दहा महिन्यांत केवळ १० टक्के म्हणजे २३ लाख रुपयेच वसूल झाले आहेत. पालिकेकडे दाखल्यासाठी किंवा कोणतीतरी परवानगीसाठी व्यक्ती आली की आधी त्याची घरफाळा-पाणीपट्टी जमा करून घेतली जाते. अशा वसुलीचाही या १० टक्क््यांमध्ये समावेश आहे. मग कर्मचाऱ्यांनी नेमकी वसुली किती केली असा प्रश्न आहे, तर कर्मचारी वर्ग म्हणतो की, कागल शहरातील नागरिक जानेवारी, फेबु्रवारी, मार्च या तीन महिन्यांतच घरफाळा व विविध कर भरण्याच्या मानसिकतेत असल्याने आता अपेक्षित वसूल झालेला नाही. पगार थांबविल्याने कर्मचारी वर्ग आर्थिक कुचंबणेत सापडला आहे. हातउसने, कर्ज, खासगी सावकार याचा आश्रय घेतला जात आहे, तर पगारापोटी काढलेल्या कर्जावर व्याजाचा बोजा पडला आहे. या वर्षाअखेर आलेल्या सलग सुट्याही एन्जॉय करण्याचा बेत यामुळे रद्द करावा लागला आहे. मुख्याधिकारी पत्की यांनी कठोर निर्णय घेत करनिरीक्षक अभिजित गोरे यांचा कार्यभारही या कारणास्तव काढून घेतला आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांचा पगार रोखला
By admin | Published: December 27, 2015 1:13 AM