कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या काळात पुकारलेल्या संप काळातील पगार कपातीचे आदेश सरकारने दिल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. दुसऱ्या शनिवारी सुटी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी व तहसील कार्यालयांमधील कामकाज सुरू राहिले. रविवारीही ते सुरू राहणार असून, प्रलंबित कामांचा निपटारा केला जाणार आहे.सातवा वेतन आयोगासह जुनी पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेसह सरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीतर्फे ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते.
९ आॅगस्टला दुपारी हा संप मागे घेण्यात आला. या तीन दिवसांत जमिनीसंदर्भातील दाव्यांची प्रकरणे, विभागीय आयुक्त कार्यालयाशी संबंधित प्रकरणे, बंदूक परवान्यांची प्रकरणे, भूसंपादन संदर्भातील प्रकरणे, ग्रामपंचायत विभागातील न्यायप्रविष्ट प्रकरणे, टपालामधून आलेली प्रकरणे, तसेच तलाठ्यांकडून दिले जाणारे दाखले आणि सात-बारा उतारे यांचेही काम प्रलंबित राहिले.
सरकारने संप काळातील तीन दिवसांचा पगार कपातीचे आदेश दिले. त्यामुळे धास्तावलेल्या कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्याना सुटी दिवशी येऊन आपली प्रलंबित कामे करावीत असे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभाग, गृहविभाग, जमीन विभाग, भूसंपादन विभाग, ग्रामपंचायत विभाग, ‘एनआयसी’ विभागात सुरू असलेले सात-बारा व दाखल्यांचे काम, या सर्व विभागात सकाळी नऊ वाजल्यापासून कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्याकडून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व दफ्तर लावण्याचे काम सुरू होते.
सुटी असूनही दुपारपर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे हे कार्यालयात येऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. दुपारनंतरही ते कार्यालयीन वेळेत थांबून राहिले. या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांशिवाय ही कार्यालये सुरू होती. सर्व प्रांताधिकारी, तहसील कार्यालय, राजपत्रित अधिकारी यांनी संपातून माघार घेतल्याने ते संप काळात कामावर आल्याने त्यांनी शनिवारी उपस्थित राहण्याचा प्रश्नच नव्हता; परंतु पगार कपातीच्या धास्तीने ज्या विभागाची कामे प्रलंबित आहेत, ते सर्व कर्मचारी कार्यालयांमध्ये थांबून होते.
या प्रकरणांचा निपटारा झाला तरी त्यावर अधिकाऱ्यांकडून सह्या या सोमवारीच होणार आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस कार्यालये सुरू राहणार असतील, तर संघटनेकडून हे जाहीर होणे अपेक्षित होते. कारण लोकांना हे समजले असते तर ते कामानिमित्त या ठिकाणी आले असते. त्यामुळे लोकांपेक्षा आपला पगार वाचविण्याची धडपड कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आली.
...तर स्वातंत्र्यदिनीही काम सुरू राहणारसंपकाळातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारसह आवश्यकता वाटल्यास स्वातंत्र्यदिनीही कर्मचारी कामावर येणार आहेत. तसेच पुढील शनिवार व रविवारसह इतरवेळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही थांबून कर्मचारी प्रलंबित कामे पूर्ण करणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.