इचलकरंजी : विधानसभेचे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी तरतूद करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिले. त्यामुळे आज, मंगळवारपासून सुरू होणारे बेमुदत आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे निवेदन सोमवारी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना देण्यात आले.
नगरपरिषद कर्मचाºयांना लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रत्यक्ष वेतन मिळावे, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी २ जुलैपासून ‘काम बंद आंदोलन’ करण्याचा इशारा नगरपालिकेमधील सर्व कामगार संघटनांनी दिला होता. संघटनांच्या कृती समितीने आमदार हाळवणकर यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना भेटून सातवा वेतन आयोग सुरू करण्यात येईल, असे ठोस आश्वासन आमदारांनी दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित ठेवत असल्याचे यावेळी सर्व संघटनांच्या कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले.
नगराध्यक्षांना निवेदन देणाºया संघटनांमध्ये जनरल कामगार संघ, म्युनिसिपल वर्कर्स युनियन, आदर्श कामगार युनियन, स्वाभिमानी कामगार संघटना, भारतीय मजदूर संघ यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यामध्ये के. के. कांबळे, अण्णासाहेब कागले, शिवाजी जगताप, संजय कांबळे, सुनील बेलेकर, गौस जमादार, संजय शेटे, आदींचा समावेश होता.एकाच युनियनचे आंदोलन सुरूसातव्या वेतन आयोगासाठी ‘काम बंद’ आंदोलनामध्ये नगरपरिषद कामगार युनियन सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अन्य संघटनांनी आंदोलन स्थगित ठेवले असले तरी नगरपरिषद कामगार युनियनचे आंदोलन सुरू राहणार असल्याने आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता लागून राहिली आहे.