कोल्हापूर : येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) भवनमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. वेतनासाठी या कर्मचाऱ्यांचा राज्यकर आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू आहे.जीएसटीच्या कोल्हापूर विभागात १२५ कर्मचारी हे कंत्राटी तत्त्वावर मुंबईतील सीआयएस ब्युरो फॅसिलिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रुजू झाले. या कर्मचाऱ्यांना आॅक्टोबर, नोव्हेंबरचे वेतन अदा करण्यात आले. त्यानंतर दि. ३१ मार्चला त्यांचे काम थांबविण्यात आले.
त्याबाबत विचारणा केली असता, संबंधित कंपनी अथवा जीएसटी विभागाकडून काहीच ठोस सांगण्यात आले नाही; त्यामुळे थकीत वेतनाबाबत काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यकर सहआयुक्त (प्रशासन), सहायक राज्यकर आयुक्त यांची भेट घेतली. त्यानंतर दि. ११ एप्रिलला मुंबई येथे सहायक राज्यकर आयुक्त (आस्थापना पाच) उज्जैन पुंड यांची भेट घेऊन ठरावानुसार आणि वेतन अदा करावी, अशी मागणी केली. त्यांनी फाईल प्रोसेसमध्ये असून, विशेष राज्यकर आयुक्तांकडे भेटण्यास सांगितले. आम्हाला थकीत वेतन ठरावानुसार मिळावे, अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
लवकरच थकीत वेतनाचा प्रश्न मार्गीया कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी शासकीय मान्यता होती. वरिष्ठ कार्यालयाकडून काही तांत्रिक त्रुटी दाखविण्यात आल्या होत्या. त्यांची पूर्तता करून संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव बुधवारी वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. लवकरच या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती जीएसटी भवनमधील सूत्रांनी दिली.