कोल्हापूर : ‘गल्लीत गोंधळ... दिल्लीत मुजरा...’ या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाची आठवण सोमवारी (दि. १) दुपारी झाली. कारण होते हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या अपक्ष उमेदवार किशोर पन्हाळकर यांनी अनामत रक्कम भरताना दिलेल्या चिल्लरचे. ती मोजताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची घामाघूम होऊन जवळपास दोन तास जागेवरून हालता आले नाही.
पेठवडगाव येथील किशोर राजाराम पन्हाळकर हे २७ वर्षीय दिव्यांग मतदार आहेत. अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी आहे. अर्ज भरण्यास १५ मिनिटे शिल्लक असताना पन्हाळकर यांनी अपक्ष म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडे अर्ज सादर केला. यासोबत त्यांनी अनामत रक्कम म्हणून काही मोजक्या नोटा व पिशवीभर चिल्लर दिली. ही रक्कम मोजायची या कल्पनेने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली; परंतु दुसरा पर्याय नसल्याने संबंधितांनी हे पैसे मोजायला घेतले. पहिल्यांदा नोटा मोजायला सुरुवात केली. ही रक्कम साडेसहा हजार रुपयांची होती. उरलेली रक्कम ही चिल्लर असल्याने ती साडेसतरा हजार भरते का नाही? हे पाहण्यासाठी टेबलावर ती पसरून एक एक करून प्रत्येक कर्मचाºयाने ती मोजायला सुरुवात केली. एखाद्या बॅँकेतील कॅशिअरप्रमाणे पैसे मोजण्याचा सराव नसल्याने या कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.