कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट असणे बंधनकारक आहे. ज्यांनी आपले नावे नोंदविलेली नाहीत, अशा अधिकारी,कर्मचारी यांचे वेतन जिल्हा कोषागार शाखा यांच्याकडून मंजूर केले जाणार नाही असा इशारा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी शनिवारी येथे दिला.भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीत नांव नोंदणीसाठी पात्र किंवा अद्यापही मतदार यादीत नांव समाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरिकांची नोंदणी करण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे. त्यासाठी संबंधितांनी नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत याची खात्री करावी.
तसेच अद्यापही मतदार यादीत नांव समाविष्ट नसलेल्यांनी नमुना क्रमांक ६ (कागदपत्रासह) भरावा किंवा आयोगाने विकसित केलेल्या संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने सादर करण्यात यावा. त्यानंतर त्यांनी सादर केलेला अर्ज संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालयास (निवडणूक शाखा) किंवा संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहनही उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.