कोल्हापूर : नोकऱ्या देणे हे विद्यापीठांचे पहिले काम नसले, तरी विद्यापीठांच्या प्राधान्यक्रमावरील हा प्रमुख विषय असायला हवा. बेरोजगारीची तीव्रता कमी करण्यात अपयशी ठरल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सोमवारी येथे दिला. शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापनदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये शिवाजी विद्यापीठाने मौलिक स्वरूपाचे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हानांचा वेध घेताना डॉ. भोसले म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या ३०० विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकही विद्यापीठ नाही. काळानुरूप बदलासाठीची तयारी नसणे हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. बेरोजगारी हे आपल्या व्यवस्थेसमोरील सर्वाधिक मोठे आव्हान आहे. देशातील सुमारे ३५ टक्के विद्यार्थी पदवी शिक्षणाला प्रवेश घेतात; पण ते पूर्ण करीत नाहीत. विद्यापीठीय व्यवस्थेतून शिकून बाहेर पडणाऱ्यांमधील रोजगारक्षमतेचा अभाव हेच बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे. आपल्याकडे खासगीच नव्हे, तर सार्वजनिक क्षेत्रांतही रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. तथापि, शिक्षणाच्या बरोबरीनेच आवश्यक कौशल्ये नसल्याने यापासून तरुण वंचित राहतात. हे चित्र बदलण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा.डॉ. भोसले म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने स्थापनेपासूनच अद्ययावत अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य दिले, तरी पारंपरिक शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले. यंदाचा वर्धापनदिन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कारकिर्दीतील अखेरचा आहे. त्याचे भावनिक प्रतिबिंब त्यांच्या अध्यक्षीय भाषणात दिसून आले. साडेचार वर्षांपूर्वी विद्यापीठात रुजू झालो; पण आता अनेकांशी माझे जन्मभराचे ऋणानुबंध निर्माण झाले. पूर्णत: कोल्हापूरमय झालो, अशी भावना डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.गौरव सोहळाविद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीचे डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बी. आर. खेडकर यांनी मूळ पुतळा साकारला आहे. त्या पुतळ्याच्या प्रतिकृती पगमार्क आर्ट गॅलरीचे रमण कुलकर्णी, अतुल डाके आणि मनोहर टॉईजचे दीपक महामुनी यांनी साकारल्या आहेत. त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.सातारा कॉलेजचा सन्मान‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळविणाºया ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा व आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, रामानंदनगर, बुर्ली या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.‘पदार्थ विज्ञान’ला उत्कृष्ट अधिविभागाचा पुरस्कारशिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठातील गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक, संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि शिक्षक, सेवकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोमवारी केला.प्रा. डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. याप्रसंगी शिवाजी विद्यापाठातील पदार्थ विज्ञान अधिविभागाला उत्कृष्ट अधिविभागाचा पुरस्कार दिला.
रोजगारनिर्मिती हा विद्यापीठांचाही प्राधान्यक्रम हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:59 AM