पेरणोली : बांबू क्षेत्रात टिकून राहिल्यास भविष्यात बांबूच्या विविध प्रकारात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र बांबू प्रवर्तक प्रतिष्ठानचे सल्लागार जयंत पाटील यांनी केले.
पेरणोली (ता. आजरा) येथील हिरण्यकेशी बांबू ग्राम विकास गटातर्फे बांबू खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गटाचे उपाध्यक्ष इनास फर्नांडीस होते.
पाटील म्हणाले, पुढील २२ वर्षांत विविध प्रकारच्या संधी निर्माण होणार असल्याने तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अनुदानासाठी बांबू लागवड न करता शाश्वत आर्थिक विकासासाठी लागवड करा.
समन्वयक अजित भोसले म्हणाले, किफायतशीर व नियोजनबद्ध लागवड केल्यास बांबू उसाला पर्याय ठरू शकतो.
यावेळी वनक्षेत्रपाल अमरजित पवार, फर्नांडीस यांनी मनोगत व्यक्त केले. पाटील व भोसले यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. जमीन दिल्याबद्दल मुकुंद कांबळे यांचा सत्कार झाला.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी के. एम. मोमीन, अध्यक्ष कृष्णा वरेकर, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, बी. के. कांबळे, महेश कालेकर, हिंदुराव कालेकर, संताजी सोले, अर्जुन कांबळे, अरविंद नावलकर, आदी उपस्थित होते. कृष्णा सावंत यांनी प्रास्ताविक केले. संतराम केसरकर यांनी सूत्रसंचालन केले. सतीश कांबळे यांनी आभार मानले.
---------------------------
* फोटो ओळी : पेरणोली (ता. आजरा) येथे बांबू केंद्राचे उद्घाटन करताना जयंत पाटील, अजित भोसले, सतीश कांबळे, कृष्णा वरेकर, इनास फर्नांडीस, के. एम. मोमीन, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १४०३२०२१-गड-०३