कोल्हापूर : मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापुरात सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील नाळे कॉलनीतील निवासस्थानावर काढण्यात येणारा मोर्चा मंत्री पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असल्यामुळे रद्द करण्यात आला. सलग तीन वेळा पाटील यांनी हुलकावणी दिली असल्याची संतप्त प्रतिक्रिया गिरणी कामगारांकडून यावेळी उमटली. अखेर संभाजीनगर बसस्थानक येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मुंंबईत गिरणी कामगारांना मोफत घरे द्या, कामगारांच्या मुलांना नोकऱ्या द्या, कामगारांना रेशन द्या, मालकाला कर बसवा, गिरणी कामगाराला मोफत घर द्या, आदी मागण्यांसाठी शनिवारी सर्व श्रमिक संघ, कोल्हापूर (गिरणी कामगार विभाग) यांच्यातर्फे संभाजीनगरातील नाळे कॉलनीमधील पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार होता; परंतु चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूर येथील दौऱ्यावर असल्यामुळे मोर्चा काढू नका, अशी विनंती जुना राजवाडा पोलिसांनी केली. या विनंतीला मान देऊन जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार संभाजीनगर बसस्थानकात जमले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सर्व श्रमिक संघ कोल्हापूरचे अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, उन्हाळी अधिवेशनानंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे पाटील यांच्या निवासस्थानावरील हा मोर्चा रद्द करण्यात आला. यावेळी संघटक दत्तात्रय अत्याळकर म्हणाले, २००५ पासून या न्याय्य मागण्यांसाठी लढा देत आहोत; पण तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवर आले, तरीही अद्याप गिरणी कामगारांना न्याय मिळालेला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत शब्द पाळावा. दिघे म्हणाले, गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी यापूर्वी तीन वेळा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगितले. पहिल्यांदा शासकीय विश्रामगृह, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला; पण पालकमंत्री पाटील त्या ठिकाणी नव्हते. त्यानंतर संभाजीनगरातील निवासस्थानावर मोर्चा काढणार असे सांगितले होते; पण ते सोलापूर दौऱ्यावर आहेत. पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असून, त्यांनी ९ एप्रिलनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊ, असे आश्वासन दिले आहे. यावेळी शांताराम पाटील (आजरा), गोपाळ गावडे (चंदगड), रामजी देसाई, अमृत कोकितकर (गडहिंग्लज), कृष्णात चौगले (राधानगरी), बाजीराव पाटील (कागल), धनाजी पाटील (भुदरगड), तुकाराम तळप (शाहूवाडी) यांच्यासह गिरणी कामगार उपस्थित होते.
गिरणी कामगारांना दादांची हुलकावणी!
By admin | Published: March 27, 2016 1:04 AM