कोल्हापूर : अधून-मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ चा अखंड गजर करत सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत केले.
फुलांच्या माळा, डिजिटल, विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी झालर यांचा वापर करुन आकर्षकपणे सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली, टेम्पो, ट्रक आदी वाहनांतून मंडळांचे कार्यकर्ते बाप्पांना आपल्या गाव, उपनगर, कॉलनीमध्ये घेवून गेले. दिवसभर चैतन्य, उत्साहाचे वातावरण होते.आपल्या घरांतील बाप्पा आणल्यानंतर दुपारी एकनंतर युवक-युवती, कार्यकर्ते मंडळाची गणेशमूर्ती आणण्याची तयारी करु लागले. ट्रॅक्टर-ट्रॉली, टेम्पो, आदी वाहने सजविण्याची त्यांची गडबड सुरु होती. काहींनी सकाळी लवकर तयारी करुन ठेवली होती.
दुपारच्या सुमारास पापाची तिकटी, गंगावेश, शाहुपुरी, बापट कॅम्प, उचगाव लोणार वसाहत, आदी परिसरातील कुंभारगल्लींमध्ये गणेशमूर्ती नेण्यासाठी मंडळांची कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. ढोल-ताशा, बेंजो, धनगरी ढोल, झांजपथक, लेझीम पथक अशा विविध पारंपारिक वाद्यांचा दणदणाट, ‘गणेश गणेश मोरया, गणपती बाप्पा मोरया’ चा अखंड जयजयकार, फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्ते बाप्पांना घेवून जात होते.
लहान मंडळांचे कार्यकर्ते छोटा टेम्पो, हातगाडी सजवून त्यातून गणेशमूर्ती घेवून जात होते. दुपारी अडीचनंतर साधारणत: तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या भरपावसात कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता. शिवाजीपेठ, मंगळवार पेठ, संभाजीनगर परिसरातील तरुण मंडळांनी गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी मार्गावरून मिरवणूक काढली.
राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, राजाराम रोड, बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, उमा टॉकीज, स्टेशन रोड, लक्ष्मीपुरी, सुभाष रोड, शाहुपुरी, दसरा चौक, आदी मार्गांवरून मंडळांची दिसून आली. दुपारी चारनंतर पावसाने उघडीप दिल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला.
रात्री उशिरापर्यंत अनेक मंडळे ‘श्रीं’ची मूर्ती घेवून जात होती. त्यांच्या मिरवणुुका सुरु होत्या. दरम्यान, मंडळांनी बाप्पांच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे महाद्वार रोड, आर्यविन ख्रिश्चन हायस्कूलचे मैदान, शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, बापट कॅम्प, आदी ठिकाणी बेंजो, ढोल-ताशा पथकांनी गर्दी केली.