कोल्हापूर : गेल्या २० वर्षांत किल्ले विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. मात्र याकडे राजकारण्यांपासून पुरातत्व खाते, महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याला वाचा फोडण्यासाठी १९ मार्चला शिवाजी चौकासह राज्यभर ‘घंटानाद’ आंदोलन करण्याचा इशारा विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी केला आहे. या संबंधामध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची बुधवारी भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
घनवट म्हणाले, १९९७ ते २०१८ या कालावधीचा अभ्यास करता, किल्ल्यावरील मंदिरांचे आणि जागेचे क्षेत्रफळ कमी झाले आहे, तर मशिदी आणि दर्ग्यांच्या जागा वाढली आहे. त्यामुळे १९९८ च्या नंतरची सर्व अतिक्रमणे काढून टाकावीत, पुरातत्वच्या अधिकाऱ्यांना आठवड्याला भेटी द्याव्यात आणि सध्याच्या स्थितीचा अहवाल तयार करावा, गडावरील सर्व मंदिरांच्या माहितीचे फलक लावावेत, मद्यपान आणि मांसविक्रीला बंदी करावी.
मलकापूर येथील बाबासाहेब भोपळे म्हणाले, शासनाच्याच पत्रानुसार अतिक्रमणे झाल्याचे मान्य केल्यानंतर कारवाई का होत नाही.