कोल्हापूर : शहरात रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहिम बुधवारी तिसऱ्या दिवशी आणखी तीव्र करण्यात आली. नेहमी गजबजलेल्या तावडे हॉटेल चौक ते ताराराणी चौकापर्यतची सर्व अतिक्रमणे काढून फूटपाथ पादचाऱ्यासाठी खुले केले. किरकोळ विरोधाचा प्रकार वगळता ही मोहिम शांततेत सुरु होती.
शहरात अतिक्रमणे वाढल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अनाधिकृत केबीन्स, शेडस् हटाव मोहीम सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसात फुलेवाडी, नवीन वाश नाका या भागात मोहिम अधिक तीव्रतेने राबविली.
तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी तावडे हॉटेल या गजबजलेल्या चौकातून अतिक्रमणे हटाव सुरु केली. त्यावेळी अनेक अनाधिकृत हातगाड्या, केबीन्स तसेच फलक व शेडस् हटविण्यात आली.
फेरीवाला संघटनेचे नेते दिलीप पवार यांनी हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तावडे हॉटेल चौकात आले. त्यानी या मोहीमेला विरोध केला, त्यावेळी फेरीवाल्यांची मोठी गर्दी झाली व मोहिम काही वेळ थांबविण्यात आली होती.
अतिक्रमण विभागप्रमुख पंडीत पोवार यांनी दिलीप पोवार यांची समजूत काढताना बायोमेट्रीक परवाना असलेल्या हातगाड्या हटवत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. पण बायोमेट्रीक परवाना असताना केबीन उभारली असेल तर ती हटविणार असल्याचे ठामपणे सांगितले. त्यानंतर दिलीप पवार निघून गेल्यानंतर ही मोहीम अखंडपणे सुरु ठेवली.सकाळी तावडे हॉटेल चौकात सुरु झालेली मोहीम सायंकाळी ताराराणी चौकापर्यत आली.
यावेळी फूटपाथवरील अतिक्रमणेही हटविली. त्यामुळे फूटपाथ रिकामे झाल्याने पादचाऱ्यांची सोय झाली. सुमारे १५ अनाधिकृत केबीन्स, ८ शेडस् तसेच अनेक फलक हटविण्यात आले. दोन जेसीबी, चार डंपर, ट्रॅक्टर तसेच विभागप्रमुख पंडीतराव पोवार यांच्यासह चारही विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता, १०० हून अधिक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.