कोल्हापूर : शहरात अतिक्रमण वाढत आहे. अतिक्रमणविरोधी विभाग कार्यरत आहे की नाही, अशा शब्दांत स्थायी समिती सभेत सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. महापालिकेच्या खुल्या जागांवर गाड्या वाढलेल्या असून, कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य शारगंधर देशमुख, सत्यजित कदम, भूपाल शेटे, राजाराम गायकवाड, पूजा नाईकनवरे यांनी शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
ते म्हणाले, हॉकी स्टेडिअम चौकात अतिक्रमण वाढले आहे. सदस्यांनी सांगितल्यावर मग अतिक्रमण काढणार आहात काय? अधिकाऱ्यांना दिसत नाही काय? खानविलकर पेट्रोल पंप, निर्माण चौक, शेंडा पार्क, शहरातील मुख्य रस्ते येथेही अतिक्रमण होत आहे.यावर प्रशासनाने नगररचना विभाग खुल्या जागांवरील तपासणी करील. वॉर्ड ऑफिस आणि अतिक्रमण विभाग संयुक्तपणे कारवाई सुरू करतील, अशी ग्वाही दिली.मुदत संपण्यापूर्वी विकासकामे करासभागृहाची मुदत संपण्यास एक महिना राहिलेला आहे. शहरातील विकासकामांचे काय केले आहे? शिबिर घेऊन प्रलंबित कामांचा निपटारा करा. फाइली परत का येत आहेत? २०२०-२१ ची कामे तातडीची करा, अशा सूचना सदस्यांनी केल्या. यावर प्रशासनाने कामे थांबविण्यात आलेली नाहीत. ई-ऑफिस व अपुरी कागदपत्रे असल्याने फाइली परत जात आहेत. आर्थिक परिस्थिती पाहून २०२०-२०२१ ची कामे करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले.खासगी हॉस्पिटलला दिलेले साहित्य परत घ्यामहापालिकेने शहरातील रुग्णालयांना व्हेंटिलेटर दिले आहेत. याचा फायदा गोरगरीब लोकांना व्हावा हाच उद्देश होता. उलट त्यांच्याकडून लाखात बिले वसूल केलेली आहेत. त्यांची सर्व खाती चेक करा. बायोमेडिकल वेस्टमध्ये वापरलेली किती पीपीई किट जमा केली जातात, याची तपासणी करा. महापालिकेने दिलेले सर्व साहित्य परत घ्या, अशा सूचनाही सदस्यांनी केल्या.कोण काय म्हणाले...
- स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार द्या : सभापती पाटील
- नागदेववाडीतील लोक परस्पर पाणी सोडतात. त्या लोकांवर कारवाई करा : शारगंधर देशमुख, सत्यजित कदम
- आयआरबीने बांधलेल्या चॅनलमध्ये दगड, फळ्या अडकल्यामुळे पावसाचे पाणी नागरी वस्तीत : विजयसिंह खाडे-पाटील