आर. एस. लाडआंबा : विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीसाठी आलेले आंदोलक रविवारी (दि. १४) सकाळी नऊ वाजल्यापासून गडाच्या पायथ्याशी ठाण मांडून होते. पोलिसांनी पांगवल्यानंतर गजापूरच्या दिशेने मागे आलेल्या आंदोलकांनी गजापूर आणि मुस्लिमवाडीतील घरे, वाहनांची तोडफोड करून प्रचंड दहशत माजवली. वास्तविक विशाळगडावरील अतिक्रमणाशी गजापूर आणि मुस्लिमवाडीतील लोकांचा काहीच संबंध नाही. तरीही ते आंदोलकांच्या निशाण्यावर आल्याने स्थानिकांनी आक्रोश केला.
विशाळगड मार्गावर असलेल्या गजापूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावाने अनेक मोहिमा पाहिल्या. शिवकाळात अनेक मावळ्यांना आश्रय दिला. गजापूर आणि मुस्लिमवाडीतील लोकांचा विशाळगडावरील अतिक्रमणांशी काही संबंध नाही. मात्र, जमावाने या दोन्ही गावांना लक्ष्य करून दिसेल त्या घरांची आणि वाहनांची तोडफोड केली. रस्त्याकडील चिकन शॉप, शीतपेयाची दुकाने फोडली. लोखंडी अँगल, पत्रे, खांब काढून दुकाने उद्ध्वस्त केली. प्रार्थनास्थळही हल्लेखोरांच्या नजरेतून सुटले नाही.अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्याने गजापूर आणि मुस्लिमवाडीतील रहिवासी धास्तावले. काहींनी घरांना कुलूप लावून सुरक्षितस्थळी धाव घेतली. मात्र, जनावरांच्या चिंतेने त्यांचा पाय गावातून निघत नव्हता. काही कुटुंबांनी शनिवारीच गाव सोडून पै-पाहुण्यांकडे आश्रय घेतला होता. मात्र, बंद घरेही हल्लेखोरांनी सोडली नाहीत. दरवाजे, खिडक्या, पत्रे फोडून घरांचे नुकसान केले. या जमावापुढे पोलिस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत होते.स्थानिकांचा आक्रोश
हल्लेखोर परतल्यानंतर गावात आलेल्या स्थानिकांनी आपल्या घरांची आणि वाहनांची तोडफोड पाहून आक्रोश केला. घरांचे तुटलेले पत्रे, विखुरलेले साहित्य, फुटलेली वाहने, बाटल्या, चिरे यांचा खच पडल्याचे पाहून रहिवाशांना अश्रू आवरता आले नाहीत. दुकाने आणि घरांना आग लागल्यानंतर तीन तासांनी अग्निशामक दलाची गाडी पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला. चूक विशाळगडावर अन् शिक्षा आम्हाला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.पोलिस पायथ्याला; आंदोलक गजापुरातवाढते आंदोलक विभागले जावेत, यासाठी एका समूहाला गजापुरात, तर काहींना पायथ्याशी रोखत आंदोलकांना गडावर न सोडण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले. मात्र, मुस्लिमवाडी आणि गजापुरातही बंदोबस्त आवश्यक होता. तो नसल्याने आंदोलकांना आयती संधी मिळाली.
पोलिसांनी कोणत्याही आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. नुकसानाचे पंचनामे सुरू असून, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोषींवर निश्चित कठोर कारवाई होईल. - महेंद्र पंडित, पोलिस अधीक्षक