कोल्हापूर : विशाळगडावर अतिक्रमण करणारे व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवावेत, पुरातत्व खात्याने परिस्थितीचा पारदर्शी अहवाल सादर करावा. गडाचे पावित्र्य भंग करणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करावा, येथील वाघजाईदेवीसह सर्व मंदिरांची व गडाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने केली. याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, पन्हाळा ते विशाळगड या रणसंग्रामाचा गौरवशाली इतिहास समाजासमोर यावा, यासाठी पावनखिंड रणसंग्रामाचे बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळ परिसरात ऐतिहासिक भव्य स्मारक येथे उभारण्यात यावे. पन्हाळा ते विशाळगड माथ्यापर्यंत गडावरील सर्व मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, स्मारके यांची माहिती देणारे फलक लावावेत.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत पुरातत्व खात्याला पत्र लिहून स्पष्टीकरण मागवू. अतिक्रमण काढण्यास पुरातत्व खात्याची तयारी असल्यास आम्ही पोलीस बंदोबस्त पुरवू. पुरातत्व खात्याच्या राज्य संचालकांशी बोलू, असे आश्वासन दिले. यावेळी संभाजी भोकरे, किशोर घाटगे, रमेश पडवळ, सुनील घनवट, किरण दुसे, रामभाऊ मेथे, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, सतीश पाटील, उत्तम पाटील उपस्थित होते.