उद्धव गोडसेकोल्हापूर : ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे करार करून ऊस वाहतूकदारांची फसवणूक केलेल्या ठेकेदारांची धरपकड पोलिसांकडून सुरू झाली. ऊस तोडणी मजुरांच्या बीड, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, लातूर, परभणी जिल्ह्यांमध्ये पोलिसांची १६ पथके रवाना झाली आहेत. आजवर ४० संशयितांना अटक झाली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. फसवणूक केलेल्या संशयितांच्या मालमत्तांवर बोजा चढवला जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.ऊस तोडण्यासाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून अनेक ठेकेदारांनी वाहतूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत जिल्ह्यात शंभराहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणुकीची रक्कम संशयितांकडून वसूल करण्यासाठी आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे दाखल करून घेण्याची विशेष मोहीम राबवली. या गुन्ह्यांच्या शोधासाठी पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली दहा कर्मचाऱ्यांची १६ पथके तयार केली आहेत. या पथकांना ऊस तोडणी मजुरांच्या गावात जाऊन त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक पंडित यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पथकांचे काम सुरू आहे.
पथकांकडून अशी कारवाई..फसवणूक केलेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. प्रकृती अस्वास्थ्य किंवा अन्य कारणांमुळे ज्या संशयितांना अटक करणे शक्य नाही, त्यांना नोटीस देऊन न्यायालयात हजर राहण्यास सांगितले जाते. फसवणुकीतील रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त करून त्यावर बोजा चढवण्याचे काम केले जात आहे.
मजूर परराज्यात पळालेगुन्हे दाखल झालेले ठेकेदार आणि मजूर परराज्यात पळाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कामासाठी गेल्यास अटक होऊ शकते, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना काही संशयितांच्या घरावर नोटीस लावून परतावे लागत आहे.फसवणुकीला आळा बसणारपोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे यापुढे होणाऱ्या फसवणुकींना आळा बसणार आहे. वाहतूकदारांची फसवणूक केल्यास गुन्हे दाखल होऊन आपल्या मालमत्तेवर टाच येऊ शकते, हे ऊस तोडणी मजूर आणि ठेकेदारांना समजले आहे. त्यामुळे यापुढे फसवणुकीचे प्रकार कमी होतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केला.