कोल्हापूर - राधानगरी येथील बाजारपेठेत एका व्यक्तीने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेल्या एका माकडाचा दुर्देवाने अंत झाला. हा माकड दिवसभर आरपार घुसलेला बाण सोबत घेऊन वेदनेने कळवळत दिवसभर उड्या मारत फिरत होता. वनखात्याच्या रेस्क्यू टीमने राधानगरीच्या स्थानिक ग्रामस्थांनि, वनखात्याने या माकडाला वाचवण्याची पराकाष्ठा केली, परंतु अखेर त्या माकडाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.राधानगरी येथे सोमवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीने झाडावर मारलेला बाण चुकून एका माकडाच्या पोटात आरपार घुसला. यामुळे हे माकड गंभीर जखमी अवस्थेत राधानगरी बाजारपेठेत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत फिरत होते. या जखमी माकडाला वाचवण्यासाठी नागरिक दिवसभर धडपडत होते.राधानगरी येथील मुख्य बाजारपेठेत हा थरार घडला. बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांना हा प्रकार समजताच त्यांनी स्थानिक वन्यजीव विभागाला याची माहिती दिली. वन विभागाने या माकडाला उपचारासाठी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते हाती आले नाही. त्याच्या पोटातून आरपार गेलेले बाण आणि त्यामुळे जखमी झालेले ते माकड यामुळे राधानगरीचे स्थानिक ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते.
संध्याकाळी उशिरापर्यंत हे माकड जखमी अवस्थेतच उड्या मारत फिरत राहिल्यामुळे सापडले नाही. अखेर कोल्हापूर येथून वन विभागाच्या रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. जखम गंभीर असल्यामुळे आणि अंधार झाल्यामुळे घाबरलेले हे माकड सापडत नव्हते. वनविभागासह स्थानिक नागरिकही त्याला पकडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत होते.
अखेर वन विभागाच्या या कोल्हापूरहुन आलेल्या रेस्क्यू टीमने रात्री ९.१५ वाजता हे माकड पकडले. आणि राधानगरी वन्यजीव कार्यालयात उपचार सुरु केले. परंतु प्रचंड जखमी झाल्यामुळे त्याला रात्री अकरा वाजता पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेण्याचे ठरविले, परंतु जखम खोल असल्यामुळे दुर्देवाने त्याचा वाटेतच मृत्यू झाला.