गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दवाढीची घोषणा आॅक्टोबरअखेर होईल. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून येत्या डिसेंबरअखेर प्रलंबित हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयातील बैठकीत मंगळवारी दिली.
‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नामुळे मुंबई येथे ही बैठक बोलाविली होती. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, उपसचिव सतीश मोघे, नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी, हद्दवाढ कृती समितीचे अध्यक्ष डॉ. एम. एस. बेळगुद्री आदींच्या उपस्थितीत ही बैठक झाली. हद्दवाढीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता व अहवाल तयार करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले.
नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, नगरपालिका व बड्याचीवाडी ग्रामपंचायतीची हरकत नसेल, तर गडहिंग्लजच्या हद्दवाढीत काहीच अडचण नाही. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तातडीने मंजुरी दिली जाईल.‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी.
नगराध्यक्ष स्वाती कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज शहराच्या उपनगरातील लोकांना नागरी आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी हद्दवाढीची आवश्यकता आहे.कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बेळगुद्री म्हणाले, १९८७ पासून हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेच्या कालबद्ध कार्यक्रमासह हद्दवाढीची उद्घोषणा व्हावी.बैठकीस उपनगराध्यक्ष उदय पाटील, नगरपालिका प्रकल्प अधिकारी नितीन देसाई, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, नगरअभियंता रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर, शिवसेनेचे दिलीप माने, काँगे्रसचे बसवराज आजरी, ‘मनसे’चे नागेश चौगुले, कृती समितीचे कार्याध्यक्ष शिवाजी होडगे, निमंत्रक रमजान अत्तार, इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र कावणेकर आदींसह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.गडहिंग्लज शहराच्या७० वर्षांपासून प्रलंबित हद्दवाढीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपण आग्रही पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेऊन या प्रश्नाला गती दिली. हद्दवाढीचा प्रश्न आता नक्कीच मार्गी लागेल, यात शंका नाही. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.- समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष, ‘म्हाडा’ पुणे.