कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० हजारांकडे जात असताना आता जिल्ह्यात केवळ ५० कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. २०२० हे वर्ष सरत असताना कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असल्याचे दिलासादायक चित्र पाहावयास मिळत आहे.
आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४९ हजार ५२७ वर पोहोचली आहे. मात्र, त्यातून तब्बल ४७७७२ जण बरे झाले आहेत. १७०५ जणांचा मृत्यू झाला आहे तर सध्या ५० जण उपचार घेत आहेत. एका एका दिवसाला दीड हजार रुग्ण सापडत असताना ही परिस्थिती आता पूर्णपणे बदलली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांनी सामूहिक लढा देत ही कोरोनाची स्थिती नियंत्रणामध्ये आणली.
त्यामुळेच हे वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ ५० रुग्ण शिल्लक असल्याचे सुखद चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या २४ तासांत केवळ नवे ८ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. मात्र, दोघांचा मृत्यू झाला आहे. कसबा बावडा येथील ७५ वर्षीय पुरुषाचा आणि सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सांगिरेवाडी येथील ६२ वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे. दिवसभरामध्ये २७९ जणांची तपासणी करण्यात आली असून १०१५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १०३ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे.