कोल्हापूर : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा महिला सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती अनुराधा खेडकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नितिन मस्के, तहसीलदार सविता लष्करे, जिल्हा परिवीक्षा अधिकारी ई. एम. बारदेस्कर, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले, आदींसह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, वसतिगृहांचे अधीक्षक उपस्थित होते.यावेळी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ व नियम २००६ संबंधात तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शिका पुस्तिकेचे प्रकाशन निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, महिलांना भेदभावापासून मुक्ती व कलम २१ अन्वये जीविताचे व स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे, महिलांनी कौटुंबिक अत्याचाराला बळी पडू नये, समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचार घडू नये, अशा व्यापक दृष्टिकोनातून केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ व नियम २००६, २६ आॅक्टोबर २००६ पासून लागू केला आहे.
या कायद्यात महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्याबरोबरच महिलांचे महत्त्व कायमस्वरूपी राहण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना केल्या आहेत. या कायद्याची जिल्ह्यात प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.