कोल्हापूर : विदेशी ई-कॉमर्स कंपन्या सध्या भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत देशात अनैतिक व्यापार करत आहेत. त्याविरोधात देशभरातील व्यापारी आक्रमक बनले आहेत. सर्व व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शासकीय प्रतिनिधी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदने पाठविण्यात येत आहेत. याअंतर्गत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना गुरुवारी निवेदन दिले.
देशात अनेक कायदे, नियम व धोरण अस्तित्वात असतानासुद्धा विदेशी ई-कॉमर्स कंपन्या कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. या कंपन्यांची चौकशी पूर्ण होऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत या कंपन्यांचे ई-पोर्टल, सर्व कागदपत्रे, संगणकाची हार्ड डिस्क आणि संपूर्ण डेटा जप्त करावा. केंद्र शासनाने ई-कॉमर्स धोरण आणि एफडीआय धोरणानुसार या कंपन्यांच्या व्यापार पद्धतीचा तपास जलदगतीने करून छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या शिष्टमंडळात ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, संचालक राहुल नष्टे, प्रशांत शिंदे, संपत पाटील, अनिल धडाम, विजय नारायणपुरे यांचा समावेश होता.
फोटो (२३०९२०२१-कोल-कोल्हापूर चेंबर) :
विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांना नियम लागू करण्याबाबतचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देऊन त्यांच्याशी चर्चा केली.