कोल्हापूर : महापालिकेतील अभियंत्यांनी अखेर तीन दिवसांनंतर सामुदायिक रजेचे आंदोलन सोमवारी मागे घेतले. महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. मात्र, या बैठकीत अभियंत्यांनी होत असलेल्या त्रासाबाबत खदखद व्यक्त केली.नगरसेवक अशोक जाधव यांनी उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्याशी वादावादी करत एकेरी भाषेचा वापर केल्यानंतर महापालिकेतील सर्व अभियंता सामुदायिक रजेवर गेले होते. आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता, सहा. अभियंता, उपशहर अभियंता अशी महत्त्वाची रिक्त पदांमुळे कामावर असणाऱ्या अभियंत्यांना लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत बैठक झाली.शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश म्हसकर म्हणाले, अतिक्रमण आणि विद्युत विभागासाठी उपायुक्त दर्जाचे अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन काम करून घेणे कठीण जात आहे. त्याचबरोबर अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अभियंत्यांना जबाबदारी नसलेली कामे करावी लागत आहेत. त्यावर स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी अभियंत्यांच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात, असे सुचविले.
नगररचना विभाग आणि वॉर्ड आॅफिस हे सक्षम असले पाहिजे. कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून किमान दोन दिवस अतिक्रमण मोहीम घ्यावी, अशी सूचना केली. महापौर लाटकर यांनी शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे.
अभियंत्यांच्या प्रत्येक विषयांबाबत आयुक्तांकडून आढावा बैठक घेण्यात येईल. या आढावा बैठकीत सर्वांनी आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे. पदोन्नती समितीची १५ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. आयुक्तांनीही मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, गटनेते सत्यजित कदम, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक ईश्वर परमार, माजी नगरसेवक राजेश लाटकर आदी उपस्थित होते.व्हिडिओ कॉन्फरन्सची सोय कराचारही उपशहर अभियंत्यांना वारंवार महापौर, आयुक्तांच्यासह पदाधिकाऱ्यांकडे यावे लागते. त्यांचा यामध्ये वेळ जातो. महापालिकेने व्हिडिओ कॉन्फरन्सीची सोय करावी, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी केली. आयुक्तांनी दोन महिन्यांत अशाप्रकारची सेवा सुरू करू, अशी ग्वाही दिली.आयुक्तांकडून डोसमहापालिका आपली आहे असे समजून सर्वांनी काम केले पाहिजे. आम्हीही खातेप्रमुख म्हणून काम केले आहे. त्यामुळे मनाला लावून घेण्याची गरज नाही. सर्वांनी वेळ देऊन टीमवर्कच्या माध्यमातून गतीने काम करावे. प्रलंबित फायलींच्या कामांसाठी सुटीच्या दिवशीही कामे करावी लागतील, असे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. मनुष्यबळ कमी असताना आपण चांगले काम करत आहोत. याबद्दल वरिष्ठ पातळीवर कौतुक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.