कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. विद्यार्थीहितास्तव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी, अशी मागणी फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.
शालेय शिक्षण विभागाने बारावी परीक्षेला अनुत्तीर्ण झालेल्या अथवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणा योजनेअंतर्गत फेरपरीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये,असा या परीक्षा घेण्यामागील उद्देश आहे. यावर्षी बारावीची मुख्य परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये झाली असून, निकाल दि. ३१ मे रोजी लागला. यानंतर दि. ११ ते २८ जुलैला फेरपरीक्षा झाली. राज्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या स्वरूपातील फेरपरीक्षांचे इतर राज्यांतील निकाल जाहीर झाले आहेत.
बारावीनंतरच्या अभियांत्रिकी शाखेतील अंतिम प्रवेशाची मुदत गुरुवारपर्यंत आहे. त्यामुळे फेरपरीक्षार्थींचा निकाल या मुदतीपूर्वी जाहीर होणे आवश्यक आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल दि. १० आॅगस्टपूर्वी लागणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त होऊनदेखील अभियांत्रिकी प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन या अभियांत्रिकी प्रवेशाची मुदत अंतिम तीन आठवड्यांनी वाढवावी, अथवा दि. १० आॅगस्टपूर्वी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी पत्रकाद्वारे केली आहे.
शिक्षणमंत्र्यांना निवेदन
अभियांत्रिकी शाखेतील अनेक प्रवेश जागा दरवर्षी रिक्त राहतात. याची दखल घेऊन फेरपरीक्षेचा निकाल लावणे अथवा प्रवेशाची मुदत वाढवावी, या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दि. २८ जुलैला निवेदन दिले आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यादृष्टीने मंत्री तावडे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.