कोल्हापूर : कोल्हापुरात रविवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. उन्हाळ्यात शाळांना सुट्टी असल्यामुळे अनेकांनी मुलांसह नातेवाईकांसोबत रविवारची सुट्टी जोडून घेत सहल आणि देवदर्शनासाठी कारणी लावली. गेल्या आठवड्यात मतदानासाठी घेतलेल्या सुटीनंतर शिवजयंती आणि अक्षय तृतियाचे मुहूर्त साधून भाविक आणि पर्यटकांनी छोट्या सुटीचा आनंद घेतला होता. रविवारीही कोल्हापुरात तब्बल ७६ हजार १०४ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शहरात मोठी गर्दी झाल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
सुटीला जोडून पर्यटनासाठी बाहेर पडलेले पर्यटक आणि भाविकांमुळे रविवारी कोल्हापूर हाऊसफुल झाले होते. बाहेरगावांहून आलेल्या पर्यटकांमुळे रविवारी कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक आणि पर्यटनस्थळांवर गर्दी होती. पुणे, मुंबईहून आलेल्या पर्यटकांनी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे पहाटे ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७६,१०४ भाविकांनी दर्शन घेतले. गेल्या आठवड्यात सुमारे दीड लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते. रविवारी अनेक पर्यटकांनी गगनबावडा, आंबा, जोतिबा डोंगर, किल्ले पन्हाळगड, विशाळगड, पावनखिंड, नरसोबाची वाडी, कणेरी मठ या ठिकाणी गर्दी केली. कोल्हापूर शहरातील रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस आणि वस्तूसंग्रहालय, अंबाबाई मंदिर परिसर, जुना राजवाडा, टाउन हॉल परिसरातील उद्यान आणि वस्तूसंग्रहालयाच्या परिसरातही मोठी गर्दी होती.
वाहतूकीची कोंडीशहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, खासबाग, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, चप्पल लाइन, पापाची तिकटी, आदी परिसरात पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूकीची कोंडी झाली होती. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने शहरातील खासगी यात्री निवास, धर्मशाळा, तसेच लॉज आदी ठिकाणेही हाऊसफुल होती.