आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 : जकातीपाठोपाठ एलबीटीमध्येही मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आल्यामुळे आर्थिक कणा खिळखिळा झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचे उत्पन्न काही प्रमाणात वाढावे या हेतूने शहरात प्रवेश करणाऱ्या बाहेरच्या जिल्ह्यातील वाहनांना प्रवेश कर लावण्याचा निर्धार महानगरपालिकेच्या सन २०१७-१८ सालाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.प्रवेश करातून १५ ते २० कोटींची वार्षिक उत्पन्न मिळेल आणि शहरातील विकास कामांवर खर्च करता येईल, अशा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा सन २०१७-१८ सालचा अर्थसंकल्प गुरुवारी स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी सर्वसाधारण सभेत सादर केला आणि सुमारे दोन तासांच्या चर्चेनंतर तो उपसुचनेसह मंजूर करण्यात आला. प्रवेश कर लावण्याचा केलेला निर्धार हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट मानावे लागेल. हा कर कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील वाहनांना लागू होणार नाही तर तो केवळ व्यवसाय, पर्यटन, यात्रा काळात येणाऱ्या बाहेर जिल्ह्यातील वाहनांकरीता असेल, असा खुलासा सभापती डॉ. नेजदार यांनी केला. महानगरपालिकेचे उ त्पन्न फारच मर्यादित स्वरुपाचे आहे, त्यातच जकात गेली. एलबीटी मध्ये नव्वद टक्के व्यापाऱ्यांना सवलत देण्यात आल्याने दिवसे दिवस उ त्पन्न कमी कमी होत चालले आहे. घरफाळा व पाणीपट्टी वाढविणे हा उत्पन्न वाढीचा पर्याय होऊ शकत नाही. म्हणून मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत हा प्रवेश कर लागू करण्याचा आमचा मानस असल्याचे नेजदार यांनी स्पष्ट केले. लहान वाहनांना २० रुपये तर अवजड वाहनांना ४० रुपये असा हा कर असावा असे आपल्याला वाटत असले तरी प्रशासनाने आता पुढील प्रक्रीया पूर्ण करायची आहे. अर्थसंकल्पात आम्ही हा निर्धार केला असला तरी प्रशानाने स्थायी समितीकडे प्रस्ताव द्यावा लागेल. त्यानंतर धोरण म्हणून महासभेची मान्यता व्हावी लागेल. महासभेच्या मान्यतेनंतरच त्याची अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे म्हणून हा निर्धार आम्ही केला आहे. यासंदर्भात लवकरच शहरातील विविध पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, टोलविरोधी आंदोलनातील कार्यकर्ते यांना महापालिकेत बोलावून त्यांना माहिती दिली जाणार आहे. शहरवासिय उत्पन्न वाढीचा हा पर्याय स्वीकारतील अशी मला आशा आहे, असेही नेजदार म्हणाले. (प्रतिनिधी)
कोल्हापूरबाहेरील वाहनांना शहरात प्रवेश कर
By admin | Published: March 30, 2017 6:06 PM