हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध चांदी उद्योजक अमोल बजरंग माळी (वय ५५, रा. पैसाफंड बँकेनजीक, मेन रोड, हुपरी) यांनी कोरोना पॉझिटिव्ह उपचारानंतर बरे होवून ही सातत्याने होत असलेल्या त्रासाला वैतागून आज पहाटेच्या सुमारास आपल्या बेडरूममध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत शहरातील दोघा चांदी उद्योजकांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिसात झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, अमोल माळी हे एक प्रतिथयश चांदी उद्योजक होते. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना कोरोना संसर्गची लागण झाली होती. कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात उपचार घेऊन बरे होऊन ते दोनच दिवसांपूर्वी घरी परतले होते. त्यांना पूर्वीपासून दम्याचा त्रास सुरू होता. त्यातच कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना आणखीन जास्तच त्रास होत होता. सातत्याने होणाऱ्या या त्रासाला वैतागून आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी बेडरूममध्ये कोणी नाही याची खात्री करून घेत डोक्यात पिस्तूलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. पिस्तूलातून उडालेल्या गोळीच्या आवाजाने घरातील सर्वांनी त्यांच्या बेडरूमकडे धाव घेतली असता तेथील दृश्य पाहून कुटुंबाने एकच आक्रोश केला. हा सर्व प्रकार सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांना समजल्याने त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमा झाली होती.
चौकट
सामाजिक उपक्रमात सहभाग
अमोल माळी हे अतिशय सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेले व अतिशय मितभाषी होते. खासगी जीवनामध्ये व चांदी व्यवसायामध्ये त्यांनी अनेकांना मदतीचा हात देऊन अनेकांचे व्यवसाय उभे करण्यास हातभार लावला आहे. त्यांचा मित्र परिवारही मोठा आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
.............
दुसरी घटना
दीड महिन्यापूर्वी तरुण चांदी उद्योजक सुनील गाट यांनी किरकोळ कारणातून वडिलांच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना विस्मरणात जाण्याअगोदरच आज पहाटे अमोल माळी या प्रतिथयश चांदी उद्योजकाने आजाराला वैतागून आपल्याच पिस्तूलाने डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या दोन्हीही घटना सर्वांनाच विचार करायला भाग पाडणा-या व चिंता वाढविणा-या आहेत.
फोटो -1) चांदी उद्योजक अमोल माळी यांनी पिस्तूलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच हुपरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासास सुरुवात केली. 2) अमोल माळी