कोल्हापूर : केंद्रात स्पष्ट बहुमत असलेले भाजप सरकार, त्यानंतर उद्योगवाढीला चालना देणारा जाहीर झालेला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आणि आता राज्यातही भाजपची सत्ता असूनही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांनी वीज दरवाढीच्या मुद्द्यावर कर्नाटकात स्थलांतरित होण्याच्या निर्णयात कोणताही बदल केलेला नाही.पायाभूत सुविधांची कमतरता, वाढलेले वीज दर, पाणी बिलातील वाढ, आदी कारणांमुळे वैतागलेल्या उद्योजकांनी कर्नाटकात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यात कोल्हापूरच्या उद्योजकांनी पुढाकार घेतला असून, त्यादृष्टीने गेल्या सात महिन्यांपासून कार्यवाही सुरू केली. उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी निवेदन देऊन, प्रत्यक्षात चर्चा, आंदोलन करूनदेखील उद्योजकांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यानंतर ‘गोशिमा’ने ज्या उद्योजकांना कर्नाटकात जमीन हवी आहे, त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले. त्यानुसार सुमारे पावणेदोन हजार अर्जांची विक्री झाली असून, त्यापैकी दीड हजारांहून अधिक उद्योजक कर्नाटकमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. त्यांनी एकत्रितपणे सुमारे १ हजार ४०० एकर जागेची मागणी केली आहे. केंद्रात बहुमत असलेले सरकार तसेच या सरकारकडून उद्योगवाढीला चालना देणारा जाहीर झालेला अर्थसंकल्प आणि आता व्यावसायिक, उद्योजकांना अपेक्षित राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हे नाराज उद्योजक कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्रात आणि राज्यात नवे सरकार आले असले तरी या सरकारला मागील सरकारने बिघडविलेली परिस्थिती सुधारण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे मत कर्नाटक स्थलांतरावर ठाम असलेल्या उद्योजकांनी व्यक्त केले आहे. सरकार जरी बदलले तरी कर्नाटकात स्थलांतरित होण्याच्या निर्णयात त्यांनी बदल केलेला नाही. आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात ‘गोशिमा’च्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या शिष्टमंडळाने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली मागणी मांडली. त्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. दरम्यान, याबाबत ‘गोशिमा’चे अध्यक्ष उदय दुधाणे म्हणाले, कर्नाटक स्थलांतरणावर आम्ही ठाम आहोत. शिवाय त्याबाबत कर्नाटक सरकारशी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. (प्रतिनिधी)विमानसेवेच्या प्रयत्नांना गती देणारपर्यावरण, सुरक्षा, आदी स्वरूपांतील आवश्यक ते ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मिळाले आहे. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून (डीजीसीए) चाचणीअभावी कोल्हापूरची विमानसेवा प्रारंभ लांबणीवर पडत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या धावपळीने मला विमानसेवेच्या मुद्द्यांकडे फारसे लक्ष देता आले नाही. येत्या चार दिवसांत दिल्लीत जाऊन ‘डीजीसीए’च्या चाचणीबाबत चर्चा करणार आहे. विमानसेवा प्रारंभ करण्याच्या प्रयत्नांना गती देण्याच्यादृष्टीने मी कार्यवाही करेन, असे महाडिक यांनी सांगितले.
कर्नाटक स्थलांतरच्या निर्णयावर उद्योजक ठाम
By admin | Published: November 05, 2014 12:17 AM