गडहिंगलज : अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून खंडणीसाठी त्रास देणाऱ्या येथील ‘त्या’ माजी नगरसेविकेसह सपोनि राहुलकुमार श्रीधर राऊत (वय ३५, सध्या नेमणूक, पोलिस कंट्रोलरूम, अमरावती, मूळगाव निलजी, ता. गडहिंग्लज) या दोघांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजित राठोड यांनी ५ दिवसाची पोलिस कोठडी दिली. अन्य संशयित विशाल बाणेदार व संकेत पाटे (रा. पुणे) यांचा पोलिस कसून शोध घेत आहे.शुक्रवारी रात्री संतोष शिंदे यांनी पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुनसह विष पिऊन व गळे चिरून घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे ‘ती’ माजी नगरसेविका व सपोनि राऊत हे दोघेही गडहिंग्लजमधून पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी रविवारी विजापूर येथील हॉटेलातून शिताफीने ताब्यात घेतले.सोमवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात ‘त्या’ नगरसेविकेसह राऊतला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले. आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय गडहिंग्लजच्या वकील संघटनेने घेतल्यामुळे आरोपींनी संकेश्वरचे वकील संजय मगदूम व सागर माने यांना बोलावून घेतले. माणुसकीला काळिमा फासलेल्या आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये म्हणून उपस्थित लोकांनी संकेश्वरच्या वकिलांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या मध्यस्थीने न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी आरोपींची बाजू मांडली. मोठा जनसमुदाय व घोषणाबाजीमुळे न्यायालयाच्या परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.यावेळी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर, सपोनि विक्रम वडणे, शीतल शिसाळ यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात होता.
यासाठी मागितली पोलिस कोठडीपुण्यातील दोन संशयित व आरोपी यांच्यात संगनमत आहे का? त्यांच्याकडील शिंदे यांचे साडेसहा कोटी येणी, हनी ट्रॅप, आरोपींच्या मोबाइलमधील माहिती व बँकेच्या व्यवहारातील तपशील आदी बाबींच्या तपासासाठी आरोपींना अधिकाधिक पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारतर्फे नीता चव्हाण यांनी केली. तथापि, शिंदे यांनी पत्नी व मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केल्यामुळे आरोपींना कमीत कमी पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. परंतु, त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली.
‘राऊत’ला निलंबित कराखोट्या गुन्ह्यात अडकवून उमद्या उद्योजकाला पत्नी-मुलासह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या ‘त्या’ नगरसेविकेसह सपोनि राऊत याच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच राऊत याला सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांच्याकडे केली. दरम्यान, शिवसैनिकांसह घरी जाऊन शिदेंच्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले.
निर्विकार आरोपी, संतप्त जनसमुदायआरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी आणल्याचे समजताच शहरातील विविध पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात जमले होते. आरोपींनी बाहेरचे वकील आणल्याचे समजताच जनसमुदायाने जोरदार घोषणाबाजी करून संतप्त भावना व्यक्त केल्या. परंतु, आपण काही केले नसल्याच्या अर्विभावात वावरणाऱ्या आरोपींचे चेहरे मात्र निर्विकार असल्याचे दिसून आले.